EPFO कडून मोठी अपडेट : 7.8 कोटी कर्मचाऱ्यांना PF रक्कम ATM मधून काढता येणार
कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम थेट ATM मधून काढता येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भातील अंतिम घोषणा ईपीएफओच्या सर्वोच्च संस्था CBT च्या ऑक्टोबरमधील बैठकीत होणार आहे. मात्र, UPI द्वारे पीएफ काढण्याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.
कर्मचाऱ्यांना दिलासा
ATM सुविधा सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी अर्ज किंवा ऑनलाईन क्लेम करण्याची गरज राहणार नाही. थेट एटीएम कार्डद्वारे पीएफ रक्कम मिळू शकेल. यामुळे दीर्घकाळापासून असलेली प्रतीक्षा संपणार आहे.
CBT च्या सदस्यांच्या मते, ईपीएफओच्या आयटी तंत्रज्ञांनी ही सुविधा देण्यासाठी तांत्रिक तयारी पूर्ण केली आहे. मात्र ATM मधून किती रक्कम काढता येईल, याची मर्यादा नंतर जाहीर केली जाईल.
मंत्रालयाची तयारी
कामगार मंत्रालयाने या सुविधेसाठी रिझर्व्ह बँक आणि विविध बँकांसोबत चर्चा सुरू केली आहे. सरकारचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना त्यांची PF रक्कम सहज, तत्काळ आणि कागदपत्रांचा त्रास न होता मिळावी, असे आहे. सध्या EPFO कडे 7.8 कोटी सदस्य असून त्यांच्या खात्यात सुमारे 28 लाख कोटी रुपये जमा आहेत. 2014 मध्ये ही ठेव केवळ 7.4 लाख कोटी रुपये होती.
सुविधा कशी मिळेल?
-
सदस्यांना विशेष EPFO ATM कार्ड दिले जाईल.
-
हे कार्ड UAN (Universal Account Number) शी लिंक असेल.
-
मान्यताप्राप्त ATM मधूनच पैसे काढता येतील.
-
भविष्यात UPI सुविधा सुरू झाल्यास, PF खाते UPI ॲपशी (जसे GPay, PhonePe, Paytm) लिंक करूनही पैसे काढता येतील.