राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, मनसेच्या स्थापनेपासून सोबत, खंदा शिलेदार 20 वर्षांची साथ सोडणार?

प्रसाद रानडे, रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने कोकणात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून चिपळूण येथील उद्योजक प्रशांत यादव यांना भाजप प्रवेश देण्यात आला. यादव हे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांचे खंदे शिलेदार मानले जात. त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

आता दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोकणात हादरा देण्याची तयारी सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण संघटक वैभव खेडेकर यांचा लवकरच भाजप प्रवेश होईल अशा चर्चा सध्या खुलेआमपणे मतदारसंघात सुरु आहेत. वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचंही बोललं जातं.

वैभव खेडेकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेशाची ऑफरही शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. त्यानंतर खेडेकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता त्यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे.

यासाठी खेडेकर यांच्या भाजपच्या नेत्यांजवळ भेटीगाठी, बैठकाही झाल्याचं बोललं जातं. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री, भाजपाचे जिल्हा संपर्क मंत्री नितेश राणे यांनी लक्ष घातल्याची माहिती आहे. त्यामुळे असं झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कोकणात मनसेला मोठा धक्का बसणार आहे.

वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार मानले जातात. त्यांनी 2014 मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा धक्क बसला होता. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा मोलाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष राहिले आहेत.

आंदोलनातील थेट भिडणारा धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची खास ओळख आहे. यापूर्वी त्यांचा थेट सामना हा त्यांचे राजकीय गुरु, शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत राहिला होता, पण अलिकडे हा संघर्ष निवळला आहे. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची मोठी क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वैभव खेडेकर यांनी भाजपचा झेंडा हाती धरल्यास मनसेला कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर थेट वैभव खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या चर्चांचा इन्कार केला. असं काही असेल, तर मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेन, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र वैभव खेडेकर यांच्या खेड येथील बालेकिल्लातच त्यांच्या भाजप प्रवेशाची खुलेआम चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर त्यांचेच निकटवर्तीय कार्यकर्ते खाजगीत हा प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं सांगत गणेशोत्सवानंतर हा प्रवेश होईल असं सांगतात.