Pune News : महापालिका निवडणुकांसाठीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांनी मतांची गणिते मांडायला सुरुवात केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. कुणी “है तैयार हम…” तर कुणी “आमचा नेता लय पावरफुल…” अशा गाण्यांवर आधारित पोस्ट टाकत आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
३ वर्षांनंतर उमेदवारांमध्ये नवसंजीवनी
२०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये निवडणुका अपेक्षित होत्या; परंतु ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांचा उत्साह मंदावला होता. मात्र, आता प्रभाग रचना स्पष्ट झाल्याने इच्छुकांमध्ये पुन्हा उत्साहाचा संचार झाला आहे.
रात्रीच सुरू झाली हालचाल
शुक्रवारी रात्री उशिरा प्रभाग रचना जाहीर होताच सोशल मीडियावर प्रभागांचे नकाशे झळकले. माजी नगरसेवक व इच्छुकांनी लगेचच दुचाकीवरून फेरी मारत प्रभागाच्या सीमारेषा तपासल्या. काहींनी सकाळपासूनच नागरिकांशी संवाद साधत नवे कार्यकर्ते जोडण्यासह गणेशोत्सवाच्या माध्यमातून मतपेरणीचे नियोजन सुरू केले.
नेत्यांचे फोन आणि गणितांची जुळवाजुळव
प्रभाग जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक आणि इच्छुकांकडे नेत्यांचे फोन खणखणू लागले. भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवक, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडे ३५-४०, तर काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) कडे प्रत्येकी दहा, आणि शिंदे गटाकडे दोन माजी नगरसेवक आहेत.
त्यामुळे संभाव्य महायुती किंवा आघाडीच्या समीकरणात आपल्याला तिकीट मिळेल का, की जुने नगरसेवकच पुन्हा संधी मिळवतील, याची चर्चा सुरू झाली आहे.
गणेशोत्सवातून प्रचाराची तयारी
प्रभागांमध्ये उमेदवारांनी नेत्यांचे पोस्टर्स लावून गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रचाराची सुरुवात करण्याची तयारी केली आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेत “मीच तुमचा खरा प्रतिनिधी” असा संदेश देण्याचे नियोजन सुरू झाले आहे.