पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे शहरात पब व रेस्टॉरंटमध्ये दारू पार्ट्यांचे प्रमाण वाढले असून, त्यात अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) पुण्यातील एका हायप्रोफाईल पार्टीवर धडक कारवाई करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी राजा रावबहादूर मिल्स परिसरातील किकी पब मध्ये एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस व व्हीव्हीआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळपासून सुरू झालेल्या या पार्टीत शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. मात्र आयोजकांनी विद्यार्थ्यांचे वय तपासले नाही, तसेच कोणतेही रेकॉर्ड ठेवले नाही. १७ ते २१ वयोगटातील मुलांना सर्रास दारू पुरवली गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत माहिती मिळताच मनविसेने राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांसह पबवर छापेमारी केली. कारवाईदरम्यान पार्टी सुरूच होती. अखेर रात्री उशिरापर्यंत पार्टी बंद पाडून आयोजक व पब चालकांवर कारवाई करण्यात आली.
ही मोहीम मनविसे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी अभिषेक थिटे, विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
👉 मनसेने या प्रकाराचा निषेध नोंदवत कठोर इशारा दिला आहे :
“यापुढे कोणत्याही पब किंवा रेस्टॉरंटने अल्पवयीन मुलांना दारू पुरवली तर त्या पबची एकही काच शाबूत ठेवली जाणार नाही; संपूर्ण बार फोडून टाकला जाईल.”