पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला आता नवे नाव मिळाले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार वेल्हे तालुक्याला आता अधिकृतरीत्या ‘राजगड तालुका’ म्हणून ओळख मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या या तालुक्याचे नाव बदलण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील नागरिकांचा पाठपुरावा लक्षात घेऊन अखेर हा निर्णय अमलात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडूनही या बदलाला मंजुरी मिळाली असून, लवकरच याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
-
राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तब्बल २७ वर्षांचा स्वराज्य कारभाराचा साक्षीदार आहे.
-
याच किल्ल्यावरून स्वराज्याचा विस्तार साधला गेला आणि अनेक निर्णायक मोहिमा राबवल्या गेल्या.
-
वेल्हे गावाच्या नावावरून तालुक्याची ओळख असली तरी, ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ‘राजगड’ हे नाव देण्याची मागणी होती.
-
या तालुक्यातील राजगड व तोरणा किल्ले शिवकालीन इतिहासातील मानबिंदू मानले जातात.
मागणीला मिळाले यश
या विषयावर २०२३ मध्ये अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पाठपुरावा केला होता. आता उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
तालुक्याला नवी ओळख
‘राजगड’ या नावामुळे तालुक्याला ऐतिहासिक अभिमानाची नवी देणगी मिळाली आहे. पुणे जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशात हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.