PMC BIG NEWS : प्रभाग रचनेची प्रतीक्षा; इच्छुकांची धाकधूक वाढली
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना उद्या (२२ ऑगस्ट) जाहीर होण्याची शक्यता असून, त्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत मुदत असणार आहे. केवळ सहा दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने इच्छुक उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. सध्या मात्र “माझा प्रभाग नेमका कसा असणार?” या प्रश्नामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.
महापालिकेची निवडणूक मार्च २०२२ मध्ये अपेक्षित होती. मात्र तीन वर्षांपेक्षा अधिक काळ निवडणुका न झाल्याने कारभार प्रशासकाच्या हाती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने सर्व महापालिकांना प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले. पुणे महापालिकेने ४ ऑगस्टला आपला प्रारूप आराखडा शासनाला पाठवला होता. नगरविकास विभागाने अंतिम फेरफार करून तो निवडणूक आयोगाकडे सुपूर्त केला.
आता २२ ऑगस्टपासून २८ ऑगस्टपर्यंत हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यासाठी २२ ऑगस्टलाच प्रारूप रचना जाहीर होणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून कागदपत्र मिळाल्यानंतर ती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती समजते. मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
दरम्यान, प्रभाग रचना सत्ताधारी भाजपच्या फायद्याचीच असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तीन सदस्यांचे प्रभाग मध्यवर्ती भागात ठेवल्याची चर्चा देखील रंगली होती. नगरविकास विभागाने शेवटचा हात फिरवल्यानंतर किती बदल झाले आहेत, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
गेल्या तीन वर्षांत निवडणुका न झाल्याने इच्छुक व माजी नगरसेवकांची संख्या मोठी झाली आहे. सतत जनसंपर्क व उपक्रम राबवून त्यांनी आपली तयारी दाखवली आहे. मात्र, प्रभाग कसा असेल हे स्पष्ट झाल्यावरच त्यांचे राजकीय गणित मांडता येईल.
वेळापत्रक
-
२२ ते २८ ऑगस्ट : प्रारूप रचना जाहीर, हरकती व सूचना नोंदविणे
-
२९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर : हरकतींवर सुनावणी
-
९ ते १५ सप्टेंबर : सुधारित प्रारूप नगरविकास विभागाला पाठविणे
-
१६ ते २२ सप्टेंबर : प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सुपूर्त
-
३ ते ६ ऑक्टोबर : अंतिम प्रभाग रचना जाहीर