Mumbai BEST Election Results : ठाकरे बंधूंना धक्का, शशांक राव पॅनेलचा दणदणीत विजय, महायुतीला ७ जागा

Mumbai BEST Election Results : दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा (BEST Election 2025) बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला असून ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. तर शशांक राव यांच्या पॅनेलने तब्बल १४ जागांवर विजय मिळवत मोठा विजय संपादन केला. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला ७ जागांवर समाधान मानावे लागले.

१८ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. मंगळवारी निकाल अपेक्षित होता; मात्र मुसळधार पावसामुळे मतमोजणीला विलंब झाला. शेवटी रात्री उशीरा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवरील सत्ता टिकवून ठेवलेल्या ठाकरेंच्या गटाला या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे.

या निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी लढत झाली. त्यात शशांक राव पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले. प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला ७ जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने शिवसेना आणि मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

उत्कर्ष पॅनेलमध्ये शिवसेना (उद्धव गट)ची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना युतीत होती. तर महायुतीने भाजप, शिंदे गट आणि इतर संघटनांना एकत्र आणत सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवले. शशांक राव पॅनेलने मात्र अनपेक्षितरीत्या मोठी बाजी मारली.

BEST पतपेढी निवडणुकीचा अंतिम निकाल :

  • शशांक राव पॅनेल : १४ जागा

  • महायुती (सहकार समृद्धी पॅनेल) : ७ जागा

  • मनसे-शिवसेना (उत्कर्ष पॅनेल) : ० जागा ✅