Ladki Bahin Yojana: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आजपर्यंत या योजनेअंतर्गत १२ हप्त्यांचे पैसे महिलांना मिळाले असून, सध्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे.
मात्र यंदा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना एक खास आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे आणि या सणानिमित्त जुलै व ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच ३००० रुपये एकाचवेळी जमा होऊ शकतात, अशी चर्चा आहे. सरकारकडून अजून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, मागील वर्षीही रक्षाबंधनानिमित्त महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळाले होते. त्यामुळे यंदाही अशीच भेट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळतो आहे का, याची तपासणी काही महिन्यांपासून सरकारकडून सुरू आहे. सरकारी कर्मचारी, इनकम टॅक्स भरणाऱ्या महिला तसेच चारचाकी गाडी असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. मात्र, सध्या ही पडताळणी स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.
आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तपासणीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकांपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा लाभार्थ्यांची छाननी केली जाईल, अशी शक्यता आहे.