7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात होणार ‘इतकी’ वाढ
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक सुखद बातमी आहे. जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबतची प्राथमिक आकडेवारी समोर आली असून, तज्ज्ञांनी या आधारे अंदाज व्यक्त केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा — जानेवारी आणि जुलै महिन्यात — महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो. जानेवारीतील वाढ मार्चमध्ये जाहीर होते, तर जुलैमधील वाढ सप्टेंबर–ऑक्टोबर दरम्यान घोषित केली जाते.
सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 55% दराने महागाई भत्ता (DA) मिळत आहे. जानेवारी 2025 मध्ये हा दर 53% वरून 55% करण्यात आला होता. मात्र जुलै 2025 मधील भत्ता वाढ अद्याप जाहीर झालेली नाही.
जुलैपासून किती वाढ होणार DA मध्ये?
जुलै 2025 पासूनचा DA, जानेवारी ते जून 2025 या कालावधीतील ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) यावर आधारित ठरणार आहे. अद्याप सर्व आकडेवारी उपलब्ध नसली तरी तज्ज्ञांच्या मते ग्रामीण महागाईचा दबाव काहीसा कमी झालेला आहे. मे महिन्यात CPI-AL (कृषी कामगार) आणि CPI-RL (ग्रामीण कामगार) निर्देशांक घसरले असले तरी हे थेट DA साठी वापरले जात नाहीत. मात्र हे एकूण महागाईच्या प्रवृत्तीचे संकेतक आहेत. त्यामुळे यावरून DA वाढीचा अंदाज घेता येतो. तज्ज्ञांचे मत आहे की, यावेळी DA मध्ये 3% ते 4% पर्यंत वाढ होऊ शकते. म्हणजेच सध्याचा 55% दर वाढून 58% ते 59% पर्यंत पोहोचू शकतो.
पगारात किती फरक पडणार?
महागाई भत्त्याची ही वाढ जुलैपासून लागू होईल, मात्र शासन निर्णय सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच रोख स्वरूपात या वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल. उदाहरण द्यायचं झालं, तर 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला सध्या 55% DA म्हणजे 9,900 रुपये मिळत आहेत. DA 59% झाला, तर त्याला 10,620 रुपये मिळतील. म्हणजेच 720 रुपयांची वाढ होणार आहे. या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.