Woman dragged 300 feet under speeding tempo in Pune : पुण्यातील मुळशीमध्ये अतिशय भीषण अपघात झाला. धावती स्कूटी घसरली अन् तरूणीचे डोकं टेम्पोच्या खाली आले. टेम्पो वेगात असल्यामुळे तरूणी तब्बल ३०० फूटपर्यंत फरफटत गेली होती. नशीब बलवत्तर होतं म्हणून या भयंकर अपघातामधून तरूणी वाचली. डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे तरूणीचा जीव वाचला. मुळशी येथील भुकूम येथे हा अपघात झाला. पोलिसांकडून याचा तपास करण्यात येत आहे.
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघातात महिलेचा जीव हेल्मेटमुळे वाचला. भुकूम रोडवरील शेल पेट्रोल पंपाजवळ तेल गळतीमुळे रस्ता निसरडा झाला होता, ज्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा तोल गेला.
याचवेळी वृषाली (पूर्ण नाव गुप्त) ही महिला आपल्या स्कूटरवरून प्रवास करत होती. रस्त्यावर स्कूटर घसरल्याने ती खाली पडली आणि त्याचवेळी पुणे ते पिरंगुटकडे जाणाऱ्या एका टेम्पोच्या मागील चाकाखाली तिचे हेल्मेट अडकले. या अपघातात ती सुमारे ३०० फूट फरफटत गेली. हेल्मेट असल्यामुळे तिचा जीव वाचला.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषालीच्या हेल्मेटने टेम्पोच्या चाकाचा संपूर्ण भार सहन केला. त्यामुळे ती डोक्याला गंभीर दुखापती झाली नाही. हेल्मेट पूर्णपणे चिरडले गेले, तरीही तिला किरकोळ जखमा झाल्या. स्थानिकांनी तातडीने पुढाकार घेत तिला रुग्णालयात दाखल केले.
अपघातादरम्यान वृषालीने थंड डोक्याने परिस्थिती हाताळली आणि गाडी हलवू नये, अशी विनंती उपस्थितांना केली. कारण गाडी हालवली असती तर दुखापत जास्त झाली असती. स्थानिकांनी टेम्पो उचलून काळजीपूर्वक तिला बाहेर काढले आणि रूग्णालयात दाखल केले.
या अपघाताप्रकरणी बावधन पोलिसांनी टेम्पोचालक मयूर राजेश खांडरे (भुकूम येथील रहिवासी) याला अटक केली आहे. नितीन जयसिंग गायकवाड यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल गळतीमुळे रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात घडला. हेल्मेटमुळे महिलेचा जीव वाचला. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालाच.