पुणे : शहरातील दोन प्रतिष्ठित हॉटेल आणि कॅफेमध्ये अन्नपदार्थांमधून झुरळ व काचेचे तुकडे सापडल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या असून, त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिल्या घटनेत, कॅम्प परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ३१ वर्षीय महिलेच्या सूपमध्ये झुरळ आढळल्याचा प्रकार घडला. त्यांनी तत्काळ व्यवस्थापनाकडे तक्रार केली, मात्र व्यवस्थापकांनी दुर्लक्ष केल्याने अखेर संबंधित महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत, डेक्कन जिमखाना परिसरातील प्रसिद्ध कॅफेमध्ये एका दांपत्याने घेतलेल्या बनमस्कामध्ये काचेचे तुकडे सापडल्याचा दावा केला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केला असून, याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तथापि, या घटनेबाबत अद्याप पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
या दोन्ही घटनांमुळे पुण्यातील अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची दखल घेत संबंधित ठिकाणी तपासणी केली आहे. नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी स्पष्ट केले आहे.