परभणी : राज्यातील शैक्षणिक संस्थांमधून पालकांवर होणारा अन्याय पुन्हा एकदा समोर आला आहे. फी भरण्यास विलंब झाल्यामुळे मुलीची ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) घेण्यासाठी गेलेल्या पालकाला शाळेच्या संस्थाचालकाने इतकी अमानुष मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील हट्टा येथील “हायटेक निवासी शाळेत” घडली आहे.
उखळद गावचे रहिवासी जगन्नाथ हेंडगे यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा काही दिवसांपूर्वी हट्टा येथील हायटेक निवासी शाळेत तिसरीत प्रवेश घेतला होता. मात्र मुलीने शाळा न आवडल्याने ती वारंवार गावातील शाळेतच टाका अशी हट्ट धरत होती. त्यामुळे पालकांनी तिचा टीसी घेण्याचा निर्णय घेतला.
टीसीसाठी शाळेत गेलेल्या जगन्नाथ हेंडगे यांनी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण यांच्याकडे उर्वरित फीबाबत चर्चा करताना, त्यांनी पूर्वी भरलेले पैसे मागितले. यावरून दोघांत वाद झाला आणि त्यातून चव्हाण व त्यांच्या पत्नीने हेंडगे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीतच हेंडगे यांचा मृत्यू झाला.
मारहाणीची माहिती मिळताच हेंडगे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर उखळद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर गावात संतापाचा भडका उडाला आहे. हेंडगे वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते आणि त्यांना गावात “महाराज” म्हणून ओळखले जायचे.
कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी या अमानुष घटनेचा तीव्र निषेध केला असून, संबंधित शाळा बंद करून संस्थाचालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हेंडगे यांना तीन अपत्ये असून, त्यांचा एकमेव आधार हरपल्याने कुटुंब दुःखात बुडाले आहे.
या प्रकरणात हेंडगे यांचे काका मुंजाजी हेंडगे यांच्या तक्रारीवरून प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, चव्हाण यांचा राजकीय दबदबा असल्याने पोलिस तपासावर राजकीय प्रभाव पडू नये व वेळेवर न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सद्यस्थितीत प्रकरणाची चौकशी सुरु असून, इतर कोणती व्यक्ती या घटनेत सहभागी आहे का? याचाही शोध पोलिस घेत आहेत. सरकारकडून निष्पक्ष आणि कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा हेंडगे कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.