मनपाच्या शाळेत गोंधळ; पालक व विद्यार्थ्यांचा संताप, नव्या इमारतीत स्वतःच सुरू केली शाळा

घाटकोपरमधील टिळक मार्गावरील मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये पुन्हा एकदा पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन करत गोंधळ घातला. यावेळी त्यांनी थेट नव्याने उभारलेल्या शाळेच्या इमारतीत शाळा स्वतःच सुरू करत प्रशासनाला थेट आव्हान दिले. यामुळे पालिकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही शाळा सध्या स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेत आहे. पालिकेने सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुमारे ३५० मराठी व हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांना दररोज इतके अंतर कापून जाणे शक्य नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हे विद्यार्थी प्रामुख्याने स्थानिक झोपडपट्टी भागातील कष्टकरी कुटुंबांतील आहेत.

तीन वर्षांपूर्वी या शाळेचा एक भाग पाडून, सहा महिन्यांत नवीन इमारत उभी करून शाळा पुन्हा येथे सुरू करू, असे पालिकेने आश्वासन दिले होते. तोपर्यंत शाळा एका छोट्या, एकमजली असुरक्षित इमारतीत सुरू होती. अलीकडे ती इमारत धोकादायक ठरल्यामुळे पालिकेने तातडीने स्थलांतराचे आदेश दिले. याला विद्यार्थ्यांनी व पालकांनी तीव्र विरोध दर्शवला.

गुरुवारी पालकांनी इशारा दिला होता की, जर नव्या इमारतीतच शाळा सुरू केली नाही, तर ते स्वतःच जुन्या इमारतीतील साहित्य घेऊन नव्या इमारतीत शाळा भरवतील. प्रशासनाने निर्णय न घेतल्यामुळे, सोमवारी पालक व विद्यार्थ्यांनी बाक, फळे, साहित्य स्वतः उचलून नवीन इमारतीत नेले आणि “शाळा आमच्या हक्काची” अशा घोषणा दिल्या.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) चे स्थानिक पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. पालकांनी स्पष्ट सांगितले की, आता आम्ही याच नव्या इमारतीत बसणार किंवा मग ३५० विद्यार्थ्यांचे शाळा सोडलेले दाखले (Leaving Certificate) घ्यावे लागतील.

या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पालकांची मागणी आहे की, पूर्णपणे तयार असलेल्या नव्या इमारतीत शाळा त्वरित सुरू करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.