पुणे | पुणे शहरात मुंबई-बेंगळुरू महामार्गाच्या आसपास झपाट्याने वाढत असलेल्या वेश्या व्यवसायावर अखेर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत लगाम घातला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ ने हॉटेल ग्रँड व्ह्यू इन, न्यू एचडीएफसी बँकजवळ, नऱ्हे परिसरात कारवाई करून परराज्यातील मुलींची सुटका केली. यामध्ये वेश्या व्यवसाय चालवणारी मुख्य महिला एजंट सपना उर्फ लक्ष्मी कदम आणि तिचे तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक ७ जुलै रोजी, पुणे शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, सपना कदम नावाची महिला एजंट वेश्यागमनासाठी मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवून व्यवहार करते. ग्राहकांच्या मागणीनुसार ठराविक हॉटेलमध्ये मुली पोहोचवून प्रत्येकी ४,००० रुपये वसूल केले जातात.
सदर एजंट सिंहगड रोड परिसरातील हॉटेल ग्रँड व्ह्यू इनमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे स्पष्ट झाल्यावर, पोलिसांनी तत्काळ छापा टाकून मुलींची सुटका केली. या मुली विविध राज्यांमधून (उत्तर भारत, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल इत्यादी) आणल्या गेल्या होत्या.
सपना उर्फ लक्ष्मी कदम (रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हिला अटक करून तिच्या तीन साथीदारांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 341/2025 नोंदवला आहे. गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 (PITA) च्या कलम ३, ४, ५ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, आणि अति. पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईतील प्रमुख अधिकारी व कर्मचारी : पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, सचिन माळवे, संदीप शिर्के, विपुल गायकवाड, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे, सतीश काकडे, दत्ताराम जाधव, स्वप्निल मिसळ
गेल्या महिन्यात सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी नवले ब्रिज परिसरातील वेश्या व्यवसाय आणि गुन्हेगारीविरोधात चक्काजाम आंदोलन केले होते. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर हे निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे वर्ग करण्यात आले. त्याच आठवड्यात कारवाई केल्याने भूपेंद्र मोरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईमुळे स्थानिक नागरिक व महिलावर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, हा फक्त प्रारंभ आहे, अशी नागरिकांची भावना आहे. परिसरात अनेक महिला एजंट व साखळी स्वरूपात चालणारा वेश्या व्यवसाय अद्यापही कार्यरत आहे. त्यामुळे यावर थेट आणि सखोल पातळीवर तीव्र कारवाईची गरज आहे, अशी मागणी भूपेंद्र मोरे व स्थानिकांनी केली आहे.
ही धडक कारवाई केवळ एका हॉटेलपुरती मर्यादित न राहता मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील सर्व भागांतील अनैतिक व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी ही साखळी मोहीम बनावी, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.