Pune Crime | पत्नी अन् तिच्या बॉयफ्रेंडच्या त्रासामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल
पत्नी आणि तिच्या मित्राच्या सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यातील नाना पेठ परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात समर्थ पोलिसांनी पत्नी आणि तिच्या पुरुष मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असून, त्यांच्या पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अतुल यांच्या आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अतुल आणि सोनाली यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असतानाच काही महिन्यांनंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. या वादांचे कारण पत्नी सोनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी असलेले मैत्रीचे संबंध असल्याचा संशय अतुल यांना आला होता.
वादामुळे सोनालीने अतुलपासून वेगळी राहायला सुरुवात केली आणि माहेरी राहू लागली. त्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे यांनी अतुल यांना सतत फोन करून मानसिक त्रास देणे, धमकावणे सुरू ठेवले. यामुळे अतुल तणावात राहू लागले होते.
या त्रासाला कंटाळून १५ जून २०२५ रोजी, अतुल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर घरात मिळालेल्या पुराव्यांवरून आणि आईच्या जबाबावरून पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शेंडगे करत आहेत. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एक सुशिक्षित तरुण पत्नी आणि तिच्या मित्राच्या मानसिक छळामुळे जीवन संपवत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.