पुणे | देशभरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असतानाच, पुण्यातील एका नामांकित स्थानिक वृत्तसंस्थेला तब्बल २४.५६ मिलियन अमेरिकन डॉलर्स (सुमारे २०० कोटी रुपये) देण्याचं आमिष दाखवणारा एक बनावट मेल प्राप्त झाला. हा मेल सध्या सोशल मीडिया आणि पत्रकारितेच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
ही घटना “दै. आरंभ पर्व” या स्थानिक दैनिकाच्या अधिकृत ईमेलवर घडली. “Bank of China, Hong Kong” येथील Mrs. Liu Xiuyun या नावाच्या व्यक्तीने स्वतःला प्रायव्हेट बँकिंग विभागातील अधिकारी असल्याचे भासवून हा मेल पाठवला होता. मेलमध्ये सांगण्यात आले की, एका गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला असून त्याच्या नावावर जमा असलेल्या कोट्यवधी डॉलर्सचा कोणीही नातेवाईक नाही. त्यामुळे मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने दैनिकाच्या प्रतिनिधीस “कागदोपत्री मृत व्यक्तीचा नातेवाईक” दाखवून ही रक्कम अर्धी वाटून घेण्याचा प्रस्ताव दिला.
इनहेरिटन्स स्कॅमचे नवे रुप : सायबर सुरक्षेत याला “इनहेरिटन्स स्कॅम” म्हणतात. यात मेल पाठवणारा व्यक्ती बनावट पद्धतीने भावनिक गोष्ट सांगतो आणि शेवटी मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखवतो. विश्वास संपादन झाल्यावर, “कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी” पैसे, बँक डिटेल्स, पासपोर्ट वगैरे मागितले जातात आणि नंतर संपूर्ण फसवणूक होते.
दैनिकाने घेतली तत्पर कृती
दै. आरंभ पर्व यांनी हा मेल मिळताच कोणताही प्रतिसाद न देता, त्याची सायबर गुन्हे शाखेकडे तात्काळ माहिती देण्याचे काम सुरू केले आहे. यासोबतच, वाचकांसाठी सतर्कतेचा इशारा देत त्यांनी हा प्रकार सार्वजनिक केला.
सर्वसामान्य नागरिकांसाठी इशारा :
कोणतीही अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे आमिष देत असेल, तर ती शक्यता फसवणुकीचीच असते.
तुमच्या वैयक्तिक माहितीची, विशेषतः बँक डिटेल्सची, कोणाशीही शेअर करू नका.
अशा ईमेल्सना ‘स्पॅम’ म्हणून मार्क करा आणि सायबर पोलिसांकडे तक्रार करा.
सायबर पोलिसांचे आवाहन : पुणे सायबर क्राईम शाखेचे एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अशा मेल्समधून बहुतांश वेळा फिशिंग किंवा आर्थिक फसवणूक केली जाते. लोकांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणतीही आर्थिक संधी वाटली तरी आधी सखोल पडताळणी करूनच पुढे पाऊल टाकावे.”