पुणे : पुणे आणि जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, संपूर्ण जिल्ह्यातील 138 प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती एकाच अॅपमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे अॅप सर्वांसाठी उपलब्ध होणार असून, पर्यटकांना गड-किल्ले, धरणे, टेकड्या, लेण्या, ऐतिहासिक वारसास्थळे आणि साहसी पर्यटन क्षेत्रांची ठिकाणे, त्या ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग, वाहन व्यवस्था, प्रवेश शुल्क, निवास व अन्नसुविधा अशा सगळ्या बाबतीत आवश्यक माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. District Administration Tourism App
ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटन विकास आराखडा तयार केला असून, अॅप तयार करण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे.
गेल्या काही काळात कुंडमळा पुल दुर्घटनेसारख्या घटनांमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना, व्यवस्थापन, शुल्क आणि पर्यटक नियंत्रणासाठी प्रभावी डिजिटल पर्यायाची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटनावर निर्बंधांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका
दरम्यान, काही साहसी पर्यटनस्थळांवर निर्बंध घालण्यात आल्याने स्थानिक ट्रेकिंग संस्था, व्यवसायिक, हॉटेल चालक, वाहन चालक आणि गाइड यांचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे. पर्यटन व्यवसायातील तज्ज्ञांनी पत्रकार परिषदेत संतुलित धोरणाची गरज व्यक्त केली.
त्यांनी “ऑनलाइन नोंदणी, मर्यादित प्रवेश, स्थानिक गाइडची सक्ती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, आणि आपत्कालीन सुविधा” यांसारख्या उपाययोजना राबवून पर्यटन स्थळे पूर्ववत सुरू ठेवावीत, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा पुढाकार
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की,
“एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी, पर्यटकांची गर्दी नियंत्रीत व्हावी आणि प्रत्येक स्थळावरील सुविधा, मार्गदर्शन आणि सुरक्षा यांचा एकत्रित अनुभव मिळावा, यासाठी या अॅपची निर्मिती केली जात आहे.” District Administration Tourism App
District Administration Tourism App हे अॅप केवळ माहितीपुरते मर्यादित न राहता, भविष्यात ऑनलाइन स्लॉट बुकिंग, स्थानिक गाइड नियुक्ती, इमरजन्सी हेल्पलाइन यांसारख्या फिचर्ससह अपग्रेड केले जाण्याची शक्यता आहे.
एकवटलेल्या माहितीचा फायदा काय?
- पर्यटकांना वेळ आणि खर्च वाचणार
- फसवणुकीच्या घटनांवर आळा
- स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
- गर्दीचे नियोजन अधिक सुलभ
- प्रशासनाकडून सुरक्षेची अधिक प्रभावी अंमलबजावणी
हा डिजिटल टुरिझम आराखडा म्हणजे पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात मानली जात आहे.