गुरूपौर्णिमा लेख 

गुरूपौर्णिमा लेख

गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

      तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ति लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते. तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून ‘मी काय केले की ती खुष होईल’, या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला ‘माझे’ म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून ‘मी काय केले की ते प्रसन्न होतील’, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते. कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्ति होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते.

सर्वोत्तम गुरुसेवा : अध्यात्मप्रसार

      गुरुकार्यासाठी आपल्या परीने करता येईल ते सर्व करणे, हा सर्वांत सोपा आणि महत्त्वाचा मार्ग होय. हे सूत्र पुढील उदाहरणावरून लक्षात येईल : समजा एका कार्यक्रमाच्या सिद्धतेसाठी कोणी साफसफाई करत आहे, कोणी जेवण बनवत आहे, कोणी भांडी धूत आहे, तर कोणी सजावट करत आहे. आपण साफसफाईच्या कामात आहोत. अशा वेळी आणखी एक जण आला आणि तो जेवण बनवणार्‍यांच्या सोबत काम करायला लागला, तर आपल्याला त्याच्याविषयी  काहीच वाटत नाही. मात्र तोच जर आपल्याला साफसफाईच्या कामात साहाय्य करू लागला, तर तो आपला वाटतो. तसेच गुरूंचे असते. गुरूंचे आणि संतांचे एकमेव कार्य म्हणजे समाजात धर्माविषयी आणि साधनेविषयी गोडी निर्माण करून सर्वांना साधना करायला प्रवृत्त करणे आणि अध्यात्माचा प्रसार करणे. आपण तेच काम जर आपल्या कुवतीप्रमाणे करू लागलो, तर गुरूंना वाटते की, ‘हा माझा आहे’. त्यांना असे वाटणे म्हणजेच गुरुकृपेची सुरुवात होय.

      एकदा एका गुरूंनी त्यांच्या दोन शिष्यांना थोडे गहू दिले आणि सांगितले, ‘‘मी परत येईपर्यंत हे गहू नीट सांभाळा.’’ एका वर्षाने परत आल्यावर गुरु पहिल्या शिष्याकडे गेले आणि विचारले, ‘‘गहू नीट ठेवले आहेस ना ?’’ त्यावर त्या शिष्याने ‘हो’ म्हणून गहू ठेवलेला डबा आणून दाखवला आणि म्हणाला, ‘‘आपण दिलेले गहू जसेच्या तसे आहेत.’’ त्यानंतर गुरु दुसर्‍या शिष्याकडे गेले आणि त्याला गव्हाबद्दल विचारले. तेव्हा तो शिष्य गुरूंना जवळच्या शेतावर घेऊन गेला. गुरु पहातात तर सगळीकडे गव्हाच्या कणसांनी डवरलेले पीक दिसत होते. ते पाहून गुरूंना खूप आनंद झाला. असेच आपल्या गुरूंनी दिलेले नाम, ज्ञान आपण इतरांना देऊन वाढवले पाहिजे.

गुरूंचे खरे स्वरूप

  1. शिष्याचा विश्वास : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.

भावार्थ : ‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे’, यातील गुरु हा शब्द बाह्यगुरूंविषयी वापरलेला आहे. गुरूंवर विश्वास असेल तरच गुरु हे ‘गुरु’ म्हणून कार्य करू शकतात. ‘गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे’, यातील गुरु हे अंतर्यामी असलेले गुरु होत.’

  1. गुरुतत्त्व एकच : सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. ज्याप्रमाणे गायीच्या कोणत्याही आचळातून सारखेच शुद्ध आणि निर्मळ दूध येते, त्याचप्रमाणे प्रत्येक गुरूंमधील गुरुतत्त्व एकच असल्याने त्यांच्याकडून येणार्‍या आनंदलहरी सारख्याच असतात. समुद्राच्या लाटा जशा किनार्‍याकडे येतात, तसेच ब्रह्म / ईश्वर यांच्या लाटा, म्हणजे गुरु, समाजाकडे येतात. सर्व लाटांतील पाण्याची चव जशी तीच असते, तसेच सर्व गुरूंतील तत्त्व एक म्हणजे ब्रह्मच असते. पाण्याच्या टाकीला लहान-मोठ्या बर्‍याच तोट्या असल्या, तरी प्रत्येक तोटीतून टाकीतीलच पाणी येते. विजेचे दिवे कितीही निरनिराळ्या आकाराचे असले, तरी वहाणार्‍या विजेमुळे निर्माण होणारा प्रकाशच त्यांतून बाहेर पडतो. तसेच गुरु बाह्यतः निरनिराळे दिसले तरी त्यांच्यातील गुरुतत्त्व, म्हणजेच ईश्वरीतत्त्व एकच असते.

      गुरु म्हणजे स्थूलदेह नव्हे. गुरूंना सूक्ष्मदेह (मन) व कारणदेह (बुद्धि) नसल्याने ते विश्वमन आणि विश्वबुद्धीशी एकरूप झालेले असतात; म्हणजेच सर्व गुरूंचे मन अन् बुद्धि हे विश्वमन आणि विश्वबुद्धि असल्याने ते एकच असतात.

गुरु आणि इतर

अ. शिक्षक आणि गुरु : शिक्षक ठरावीक वेळ आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकावतात, तर गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्याथ्र्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्याथ्र्यांशी संबंध काही घंटे आणि आणि तोही काही विषय शिकावण्यापुरताच मर्यादित असतो.

आ. सर्वसाधारण व्यक्ति, साधक आणि गुरु : पुढील कोष्टकात सर्वसाधारण व्यक्ति, साधक आणि गुरु यांच्यातील कर्मामागील इच्छा, एकूण कर्म आणि क्रिया, तसेच कर्म आणि क्रियांचे प्रमाण दिले आहे. कर्म म्हणजे हेतुसहित कृति, तर क्रिया म्हणजे हेतुविरहित कृति. साधनेत जसजशी प्रगति होते, त्या प्रमाणात स्थूलदेह सोडून इतर देहांचे कर्म न्यून होत जात असल्याने एकूण कर्म आणि क्रिया अल्प होत जाते.

संत आणि गुरु

 संत सकामातील आणि निष्कामातील प्राप्तीसाठी थोडेफार मार्गदर्शन करतात. काही संत लोकांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी, तसेच वाईट शक्तीच्या त्रासामुळे त्यांना होणार्‍या दुःखाच्या निवारणासाठी कार्य करत असतात. अशा संतांचे कार्यच ते असते. एखाद्या संतांनी एखाद्या साधकाचा शिष्य म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्यासाठी ते गुरु होतात. गुरु फक्त निष्कामातील (ईश्वर) प्राप्तीसाठी पूर्णपणे मार्गदर्शन करतात. एकदा एखादे संत गुरु म्हणून कार्य करू लागले की, त्यांच्याकडे येणार्‍यांच्या सकामातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, असे वाटणे हळूहळू न्यून होत जाऊन शेवटी ते बंदच होते; परंतु ते जेव्हा एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात, तेव्हा त्याची सर्वतोपरी काळजी घेत असतात. प्रत्येक गुरु हे संत असतातच; मात्र प्रत्येक संत गुरु नसतात. असे असले तरी संतांची बहुतेक लक्षणे गुरूंना लागू पडतात. 

ईश्वर आणि गुरु

अ. ईश्वर आणि गुरु एकच आहेत : गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप व ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप.

  1. अधिकोषाच्या बर्‍याच शाखा असतात. त्यांपैकी स्थानिक शाखेत खाते उघडून पैसे भरले तरी चालते. तसे करणे सोपेही असते. दूरच्या मुख्य कार्यालयातच जाऊन पैसे भरले पाहिजेत, असे नसते. तसे करण्याचा त्रास घेण्याचीही आवश्यकता नसते. तसेच भाव-भक्ति, सेवा, त्याग वगैरे न दिसणार्‍या ईश्वरासाठी करण्यापेक्षा त्याच्या सगुणरूपाच्या म्हणजे गुरूंच्या संदर्भात केल्यास ते सोपे जाते. स्थानिक शाखेत भरलेले पैसे जसे अधिकोषाच्या मुख्यालयातच जमा होतात, तसे गुरूंची सेवा केली की ती ईश्वरालाच पोहोचते.
  2. वामनपंडितांनी भारतभर फिरून मोठमोठ्या विद्वानांचा पराभव केला आणि त्यांच्याकडून पराजयपत्रे लिहून घेतली. ती विजयपत्रे घेऊन जात असतांना एका संध्याकाळी ते एका झाडाखाली संध्या करायला बसले. तेव्हा त्यांना फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसलेला दिसला. तेवढ्यात दुसरा एक ब्रह्मराक्षस बाजूच्या फांदीवर येऊन बसायला लागला, तेव्हा पहिला त्याला येऊ देईना आणि म्हणाला, ‘‘ही जागा वामनपंडितासाठी आहे; कारण त्याला आपल्या विजयाचा फार अहंकार झाला आहे.’’ हे ऐकताक्षणीच वामनपंडितांनी सर्व विजयपत्रे फाडली आणि ते हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. बरीच वर्षे तपश्चर्या केल्यावरही देव दर्शन देईना; म्हणून निराशेने त्यांनी कड्यावरून खाली उडी मारली. तेवढ्यात ईश्वराने त्यांना झेलले आणि डोक्यावर डावा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर पुढील संभाषण झाले.

पंडित  : डोक्यावर डावा हात का ठेवला, उजवा का नाही ?

ईश्वर  : तो अधिकार गुरूंचा आहे.

पंडित  : गुरु कोठे भेटतील ?

ईश्वर  : सज्जनगडावर.

      त्यानंतर वामनपंडित सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींच्या दर्शनाला गेले. समर्थांनी त्यांच्या पाठीवर उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला.

पंडित  : डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद का नाही दिला ?

स्वामी : अरे, ईश्वराने हात ठेवलेला आहेच की!

पंडित  : मग ईश्वराने ‘डोक्यावर हात ठेवायचा अधिकार गुरूंचा’, असे का म्हटले ?

स्वामी : ईश्वराचा उजवा आणि डावा हातही एकच आहे, ईश्वर अन् गुरु एकच आहेत, हे कसे कळत नाही तुला!

गुरूंचे महत्त्व

      या जन्मातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही प्रत्येक जण शिक्षक, डॉक्टर वकील वगैरे दुसर्‍या कोणाचे तरी मार्गदर्शन घेतो. मग जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्ति देणार्‍या गुरूंचे महत्त्व किती असेल, याची कल्पनाही करता येत नाही. पुढील सूत्रांंवरून ते महत्त्व स्पष्ट होईल.

अ.    मानसशास्त्रदृष्ट्या

  1. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि सामथ्र्याची चुणूक न दाखवणार्‍या देवांपेक्षा, शिष्याच्या उन्नतीसाठी या गोष्टी दाखवणार्‍या गुरूंकडे शिष्याचे लक्ष जास्त प्रमाणात वेंâद्रित होऊ शकते.
  2. गुरूंना अंतज्र्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो.
  3. ‘शिष्याला शिकवण्याऐवजी बाबा असे काय बोलतात ?’, असे काही अभ्यासू साधकांना वाटते. त्याविषयी विचारले असता बाबा म्हणाले, ‘‘मला भजी किंवा थालीपीठ आवडते असे म्हणतो, त्यामुळे एखादा शिष्य घरी भजी किंवा थालीपीठ करतो तेव्हा त्या वेळी तरी त्याला माझी आणि नाम घ्यायची आठवण होते.’’
  4. स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.

आ.   अध्यात्मशास्त्रदृष्ट्या

  1. गुरूंकडे जाणे : गुरु शिष्याला आपली आठवण करून देतात; मगच शिष्य गुरूंकडे जाऊ शकतो.
  2. संकटांचे निवारण : ‘काही भक्त मानवी स्वभावाला अनुसरून, प्रापंचिक दुःखे भगवंतांने दूर करावीत, या इच्छेने भगवंतांकडे जात. आईबाप जसे आपल्याला संकटात सांभाळतात, तसे भगवंत आपल्याला संकटातून सोडवतील, अशी त्यांची समजूत. असे भक्त पत्र लिहीत किंवा मनात भगवंतांची प्रार्थना करत. त्याचा परिणाम असा होई की, संकट तर निघून जाई किंवा संकट अटळ असले तर भक्ताच्या मनात ते सहन करण्यासाठी शांति अगर सामथ्र्य उत्पन्न होत असे. भगवंतांने तशी इच्छा केल्यामुळे असे घडत नसे, तर आपोआपच; परंतु भक्ताची श्रद्धा आणि त्याच्या शरणागतीमुळे गुरुकृपेचा जो ओघ वहात असतो, त्या कृपेमुळे हे घडून येई.
  3. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढणे : मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.

गुरुमहिमा

  1. पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतो; म्हणून पित्यापेक्षाही गुरूला श्रेष्ठ मानले आहे.
  2. एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात.
  3.   सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधी त्याचे ।।

      आपणासारिखें करिती तात्काळ । कांही काळवेळ न लगे त्यांसी ।।

      लोह परिसासी न साहे उपमा । सद्गुरु-महिमा अगाधचि ।।

      तुका म्हणे ऐसें आंधळे हें जन । गेलें विसरून खर्‍या देवा ।।

   – संत तुकाराम

  1. भगवान् श्रीकृष्णांनीही सांगितले आहे की, देवभक्तीपेक्षा गुरुभक्तिच अधिक श्रेष्ठ.

मज माझ्या भक्तांची थोडी गोडी । परि गुरुभक्तांची अति आवडी ।। – श्री एकनाथी भागवत 11:1527

   म्हणजेच श्रीकृष्ण म्हणतात, ‘माझ्या भक्तांपेक्षा गुरुभक्तच मला अधिक आवडतो.’

   आणि विश्वामाजी ईश्वरु । एकचि व्यापक सद्गुरु । म्हणूनि सर्वाभूती आदरु । करीती ते ।।  – संत एकनाथ

  1. ‘मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी, श्री तुकामार्इंच्या ठिकाणी, मला मिळाले. मला निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते. ते त्यांच्यापाशी मिळाले. – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’
  2. श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’ समर्थ रामदासस्वामींनीही दासबोधात (1.4.16) म्हटले आहे –

      शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करिता न ये । म्हणोनी उपमा न साहे । सद्गुरूसी परिसाची ।।

      7.कल्पतरुची द्यावी उपमा । कल्पिलें लाभे त्याचा महिमा । न कल्पितां पुरवी कामा । कामधेनु श्रीगुरुचि ।।- श्री गुरुचरित्र 3:35

  1. ‘गुरूंना उपमा देण्याजोगी या जगात दुसरी कोणतीही वस्तु नाही. गुरु सागरासारखे म्हणावे, तर सागराजवळ खारटपणा असतो; पण सद्गुरु सर्वप्रकारे गोड असतात. सागरास भरती-ओहोटी असते; पण सद्गुरूंचा आनंद अखंड असतो. सद्गुरु कल्पवृक्षाप्रमाणे म्हणावे, तर कल्पवृक्ष आपण जी कल्पना करावी ती पुरवितो; पण सद्गुरु शिष्याची कल्पना समूळ नाहीशी करून त्याला कल्पनातीत अशा वस्तूची प्राप्ति करून देतात; म्हणून गुरूंचे गुणवर्णन करण्यास ही वाणी असमर्थ आहे.’

संकलक – प्रा. विठ्ठल जाधव, संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’

संपर्क –  7038713883