पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !

देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा ! – महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

        पंढरपूर – आषाढीवारी चालू असतांना वारीत पुणे येथे वारकर्‍यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला. वारीत विविध संघटना यांच्याकडून घुसखोरी चालू आहे. कुणीतरी सतत देव, देश, धर्म यांच्यावर आघात घडवून आणत आहे. याच्या मागे कोण आहे हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्या डोळ्यांसमोर अन्याय, अत्याचार होत असतांना आपण शांत बसणे योग्य नाही. एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा, हे आमच्या संस्कृतीत कधीच नव्हते, तर ते आपल्यावर लादण्यात आले. सत्य, धर्म, न्याय यांसाठी प्राण गेला तरी चालेल; मात्र आपण नेहमी धर्माच्याच बाजूने राहिले पाहिजे, असे आवाहन  ‘श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला’चे महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी केले. वारकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ येथे ६ जुलैला वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनासाठी २००० पेक्षा अधिक वारकरी व हिंदू भाविक उपस्थित होते. 

        या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून वारकऱ्यांशी संवाद साधताना ”वारकरी आणि संतपरंपरा महाराष्ट्राचे वैभव असून सरकार नेहमी वारकर्‍यांच्या पाठिशी आहे”, असे आश्‍वासन दिले. अधिवेशनात विविध संत, महंत, मान्यवर यांनी केलेल्या तेजस्वी मार्गदर्शनानंतर संविधान दिंडीच्या नावाखाली, पुरोगामी, साम्यवादी यांची घुसखोरी वारकर्‍यांना मान्य नसून यापुढे त्यांनी हिंदु धर्मावर टीका केल्यास ‘जशास तसे उत्तर देण्यात येईल’, असा इशाराही या अधिवेशनात देण्यात आला.

मान्यवरांची उद्बोधपर, कृतीप्रवण करणारी मनोगते !

       श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले , ‘‘शंकराचार्य यांना दीपावलीच्या कालावधीत अटक करण्यात आली. हिंदुत्वासाठी कार्य करणारे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे कारागृहात आहेत. एकूणच हिंदुत्वावर आघात करणारी एक व्यवस्था कार्यरत असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर हे त्यांच्यापैकीच एक होते. आम्ही नेहमीच विचारांची लढाईला त्याचा प्रतिवाद करून उत्तर देतो. असे असतांना अनेक हिंदुत्वनिष्ठांना, संतांना हत्यांच्या आरोपांखाली कारागृहात टाकण्याचे षडयंत्र रचले गेले. यापुढील काळात हे थांबले नाही, तर वारकरी संप्रदाय रस्त्यावर येऊन विरोध करेल.’’ विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि सत्संगप्रमुख श्री. दादा वेदक म्हणाले, ‘‘८०० वर्ष परंपरा असलेल्या वारीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  कार्यकर्ते घुसखोरी करून वारीच्या विरोधात हिंदूंच्या श्रद्धा-परंपरा यांच्यावर आक्रमण करत आहेत. हे आपण प्रत्यकाने जाणणे आवश्यक आहे. यापुढील काळात हिंदूंनी आक्रमक मानसिकता बाळगत प्रांतभेद, भाषाभेद आपण बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल.’’

           या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘यंदाच्या वारीत वारकर्‍यांसमवेत संयुक्त अभियान राबवल्यावर चांगल्या प्रकारे बदल पहायला मिळाले. हे भक्ती आणि शक्ती यांचे व्यासपीठ असून यापुढील काळात धर्मसत्तेचा अंकुश हा राजसत्तेवर असला पाहिजे,अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. सध्या परिस्थिती गंभीर असून वारकरी सप्ताहासारखे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे येशू सप्ताह चालू झाले आहेत. त्यामुळे चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच लव्ह जिहादविरोधी कायदा समंत झाला पाहिजे.’’

                अनंत श्री विभूषित शिवव्यंकटेशानंद भारती स्वामी म्हणाले , ‘‘यापुढील काळात जे अहिंदू आहेत त्यांची दुकाने हिंदूंच्या तीर्थक्षेत्राच्या आजूबाजूला लागता कामा नयेत आणि कुणी लावल्यास हिंदूंनी जे हिंदु धर्म, देव मानत नाहीत त्यांच्याकडून खरेदी करू नये.’’ ह.भ.प. छोटे कदममाऊली म्हणाले, ‘‘वारकरी महाअधिवेशनासारखे कार्यक्रम द्वैमासिक झाले पाहिजे. प्रत्येक किर्तनकाराने त्यांच्या कीर्तनात शेवटची ५ मिनिटे ही धर्मजागृतीसाठी ठेवली पाहिजे.’’ या अधिवेशषात अधिवक्ता आशुतोष बडवे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. नरेंद्र महाराज मस्के, ह.भ.प. नारायण महाराज शिंदे, स्वामी भारतानंद सरस्वती राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने,  ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी केले.

 उपस्थित मान्यवर – महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज, उपाध्यक्ष ह.भ.प.  मोहन महाराज शिंदे आणि सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, स्वराज्य संघाचे अध्यक्ष ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, अधिवक्ता आशुतोष महाराज बडवे, विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय सहमंत्री श्री. दादा वेदक, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, ह.भ.प. छोटे कदम माऊली, ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के,  अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने, ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख, हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे आणि यांसह विविध संत- महंत, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. 

धर्मरक्षणार्थ कार्यरत धर्मरक्षकांचे सन्मान ! : या अधिवेशनात डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात खोट्या खटल्यात अडकवून २ वर्षे कारागृहवास पत्करणारे, तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’, आणि ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हा पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, वारकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वरिष्ठ वार्ताहर श्री. अजय केळकर आणि सुदर्शन वाहिनीचे वार्ताहर श्री. दीपक चव्हाण, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे श्री. गणेश लंके यांचा महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विशेष अभिनंदन : वारीत होणारी नक्षलवादी, साम्यवादी यांची घुसखोरी या संदर्भात विधान परिषेदत आवाज उठवल्याविषयी  शिवसेनेच्या सचिव व प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले, तसेच महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांचाशी पाठिशी ठामपणे उभे रहाण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला.

अधिवेशनात करण्यात आलेले काही ठराव : पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत; तसेच या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी; संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा; संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा; गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी; हिंदु युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा;  इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी यांसह ११ विविध ठराव संमत करण्यात आले.