VIDEO : कात्रज जुन्या बोगद्याजवळ धावत्या क्रेटा कारला भीषण आग; वाहन जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे (VIDEO) : कात्रज घाटातील जुन्या बोगद्याजवळ गुरुवारी सकाळी एक धावती क्रेटा कार अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर ही घटना घडली असून, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित कारचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

साताराकडून पुण्याकडे भरधाव वेगाने येत असताना, कात्रज घाटाच्या जुन्या बोगद्याजवळ अचानक क्रेटा या चारचाकी वाहनातून धुराचे लोट निघायला लागले. काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. आजूबाजूच्या वाहनचालकांनी ही बाब लक्षात घेताच तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिली.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आणि मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी पोलिसांचे पथकही दाखल झाले होते.

या घटनेत सुदैवाने वाहनातील चालक अथवा इतर कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा इंजिनमधील काही तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी सविस्तर तपास सुरू आहे.

या घटनेमुळे कात्रज घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ मार्ग मोकळा करत वाहतुकीला पूर्ववत केले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना टळली.

वाहनधारकांनी नियमितपणे आपल्या वाहनांची देखभाल करावी, इंजिन, वायरिंग आणि इंधन प्रणाली यांची वेळोवेळी तपासणी करून अशा दुर्घटनांना टाळावे, अशी सूचना वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाने केली आहे.