Pune Crime : कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर लैंगिक अत्याचार, चेहऱ्यावर स्प्रे मारून गुन्हा; मोबाईलमध्ये आरोपीने काढली ‘सेल्फी’

Pune Crime : कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत २५ वर्षीय महिलेवर तिच्याच घराच्या दरवाजात अज्ञात व्यक्तीने चेहऱ्यावर स्प्रे मारून बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढत ‘मी पुन्हा येईन’ असे लिहून ठेवले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे भासवून सोसायटीत प्रवेश मिळवला. पीडित महिलेच्या अकराव्या मजल्यावरील फ्लॅटपाशी जाऊन कुरिअर असल्याचे सांगितले. मात्र, महिला म्हणाली की, ‘कुरिअर माझे नाही,’ तरीही ‘सही करावी लागेल’ असा आग्रह करताच तिने सेफ्टी डोअर उघडले. याच क्षणी आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिचा जबाब नोंदवला जात आहे. घटनास्थळी श्वान पथकाला करण्यात आले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारामुळे उच्चभ्रू वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींना सहज प्रवेश मिळत असल्याने सोसायट्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारी, बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंद करून घेणे आणि ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत त्रुटी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.