शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पदयात्रेला प्रतिसाद

भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी १ लाख मातांची आघाडी या मतदार संघातून राहील आणि शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी गावठाण येथे दौरा करण्यात आला. यावेळी पदयात्रेची सुरूवात भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर श्री हनुमान मंदिर येथे भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत आढळराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, भोसरी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसरात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी आमदार महेश लांडगे यांच्यासह महायुती व घटक पक्षांचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील महिला-माता- भगिनींनी उमेदवार आढळराव पाटील यांचे ठिकठिकाणी औक्षण केले. भोसरी विधानसभा मतदार संघातून १ लाख मतांची आघाडी देण्याचा निर्धार श्री. भैरवनाथ मंदिरात करण्यात आला. तसेच, ‘‘बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना साथ द्या…’’ असे आवाहन यानिमित्ताने मतदार, नागरिकांना करण्यात आले.