कौटुंबिक वादामुळे पोलीस कर्मचाऱ्याने झाडली स्वतःहा वर गोळी

पुणे – खडक पोलिस ठाण्यांतर्गत लोहियानगर चौकीत पोलिस कर्मचाऱ्याने कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आला.

भारत दत्ता आस्मर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आस्मर हे लोहियानगर पोलिस चौकीत रात्रपाळी कर्तव्यावर होते. पोलिस चौकीतील विश्रांती कक्षात शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आस्मर यांनी कार्बाइनमधून स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आस्मर यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.