शौचालयाअभावी महिला-मुलींची होणारी कुचंबना थांबवावी

पुणे : शहर-उपनगरातील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांची दूरावस्था आणि समाविष्ट गावात स्वच्छतागृह नसल्याने महिला-मुलींची मोठी कुचंबना होत आहे. पीएमपी आणि एसटी बसथांबा, मजूरअड्डा या ठिकाणी प्रशासनाने सार्वजनिक स्वच्छतागृह उभारून, तसेच बांधलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व देखभाल तात्काळ करून महिला-मुलींची गैरसोय दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली. महापालिका प्रशासन, एसटी महामंडळ आणि पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभारली पाहिजेत अशी मागणी ईमेलद्वारे पुणे महानगरपालिकेकडे रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, “उपनगर आणि परिसरातील एसटी बस थांब्यावर कामगारवर्ग, गावाकडे ये-जा करणाऱ्या मंडळींची मोठी गर्दी असते. पीएमपी बसथांब्यावरही प्रवासांची वर्दळ असते. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी या धर्तीवर गर्दीच्या ठिकाणी पालिका प्रशासनाने स्वच्छतागृह उभारून पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. मधुमेहग्रस्तांना लघवीचा त्रास असतो. त्याचबरोबर महिला-मुलींच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आणि शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने स्वच्छतागृह उभारून नागरिकांना दिलासा द्यावा.”

“सातववाडी येथील एसटी थांब्यावर प्रवासी मोठ्या प्रमाणावर असतात, तर कात्रज बाह्यवळण मार्गावर उंड्री चौक, हांडेवाडी चौक, काळेपडळ रेल्वे गेट येथे राज्य-परराज्यातून कुशल-अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर उपनगर आणि लगतच्या गावात स्थायिक झाला आहे. दररोज सकाळी उंड्री, काळेपडळ, हडपसर गाव, मगरपट्टा चौक, चंदननगर, मुंढवा, हांडेवाडी चौक आदी परिसरातील मजूर अड्ड्यावर रोजगारासाठी थांबतात. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिला कामगारांची गैरसोय होत आहे. पालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वच्छतागृह उभारावेत. लातूर, नांदेड, बार्शी, पंढरपूर, नागपूर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी परिसरातील मजूर मागील अनेक वर्षांपासून उपनगर आणि परिसरात स्थायिक झाले आहेत. मजूर अड्ड्यावर स्वच्छतागृह उभारून महिलावर्गाची अडचण प्रशासनाने दूर केली पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.