विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना वास्तवाचे भान जपावे

पुणे : “युवापिढी स्मार्ट व हुशार आहे. वेगवगेळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांनी जगाला गवसणी घालण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. अशावेळी आपल्या हृदयाचे, मेंदूचे ऐकावे आणि करिअर निवडताना तार्किक विचार करावा. वास्तवाचे भान ठेवून भविष्यातील मार्ग निवडले, तर यशाचा मार्ग सापडतो,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

आळंदी येथील एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने कादंबरीकार ज्ञानेश्वर जाधवर लिखित ‘आशेच्या गुंगीत लटकलेले तारुण्य’ या कादंबरीवरील परिसंवादात लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. प्रसंगी ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, एक्स्पोन्शिया लर्निंग सोल्युशन्सच्या संचालिका सारिका कुलकर्णी, उद्योजक शरद तांदळे, लेखक ज्ञानेश्वर जाधवर, ‘एमआयटी’चे संचालक डॉ. महेश गौडर, अधिष्ठाता डॉ. श्रीधर खांडेकर, परिसंवादाचे संयोजक प्रा. हुसेन शेख आदी उपस्थित होते.

 लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “ज्ञानेश्वर जाधवर याचे लेखन आश्वासक असून, मला तो मराठीतील महत्त्वाचा कादंबरीकार वाटतो. त्याचा दर्जा आणि साहित्यिक मूल्य हे महत्त्वाचे आहे. धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता समजावून सांगणारी ही कादंबरी आहे. माणसांच्या जगण्यातील सुख-दुःखे समजण्यासाठी समता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये रुजवण्यासाठी साहित्य महत्त्वपूर्ण ठरते. पुस्तके वाचणारी माणसे घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचत राहावे.”

डॉ. आनंद कुलकर्णी म्हणाले, “आळंदी हे मला दोन कारणासाठी महत्त्वाची वाटते. तेराव्या शतकात ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजाला जगण्याचा संदेश दिला. आज या ज्ञानेश्वराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी ‘आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य’ ही कादंबरी दिली आहे. युवापिढीला, पालकवर्गाला ही कादंबरी मार्गदर्शक ठरेल. कसदार आशय व रोजच्या जगण्यातली भाषा यामुळे ही कादंबरी आपल्याच जगण्यावर प्रकाश टाकते, असे वाटते.”

सारिका कुलकर्णी म्हणाल्या, “आपल्याकडे व्हाईट कॉलर नोकरीला अधिक महत्त्व आहे; पण ते सर्वस्व नाही. वर्तमान पिढीसमोर अनेक संधी आहेत. त्यातून काही विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊन करिअर निवडावे. स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नसून, त्यात करिअर करणे म्हणजेच यशस्वी होणे असेही नाही. माणूस म्हणून जगणे हे खऱ्या अर्थाने यश आहे.”

शरद तांदळे म्हणाले, “स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वतःची क्षमता ओळखून वेळ द्यावा. दोन-तीन प्रयत्नात निवड झाली नाही, तर पर्यायी मार्ग निवडावा. ‘प्लॅन बी’ सुरुवातीपासून तयार ठेवायला हवा. मोठी स्वप्न पाहण्यास हरकत नाही; परंतु स्वप्नपूर्तीसाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी.”

ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरी लेखन व विषयाची पार्श्वभूमी विशद केली. प्रा. हुसेन शेख यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. महेश गौडर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. महेंद्र शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीधर खांडेकर यांनी आभार मानले. कौस्तुभ रेळेकर व ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्यांनी कादंबरीवर पेपर वाचन केले.