पुणे, वार्ताहर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य नंदकुमार पंढरीनाथ सागर यांनी सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी सागर यांना अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतून शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सासवडमध्ये महापुरुषांना अभिवादन
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सासवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिक्षक बांधव-भगिनी एकत्र आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांचा समूह पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाला.
यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा प्रतिनिधी विधान परिषदेत जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नंदकुमार सागर यांनी शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी विविध विषय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सागर यांच्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली. शिक्षकांच्या सेवा व वेतनविषयक समस्या, जुनी पेन्शन योजना, शाळांना मिळणारे अनुदान, शैक्षणिक धोरणे तसेच शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी, पुणे व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त व पदाधिकारी, विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी, विषय संघटनांचे प्रतिनिधी, अल्पसंख्याक शाळांचे प्रतिनिधी, आश्रमशाळा संघटनांचे पदाधिकारी तसेच पुणे विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सेकंडरी बँकेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर २०२६ असून, निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.





