मुंबई ०१ ऑक्टोबर २०२६: पाञ्चजन्यच्या ‘सुशासन संवाद – मुंबई संकल्प’ या उपक्रमात प्रमुख लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, विचारवंत, सामाजिक नेते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ एकत्र आले. मुंबईतील द ताज महाल पॅलेस, कुलाबा येथे आयोजित या संवादामध्ये सुशासन, नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि भारताच्या विकासप्रवासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
पाञ्चजन्यच्या संवादमालिकेतील या विशेष भागात ‘सुशासन’ या संकल्पनेवर तसेच अधिक सक्षम आणि जबाबदार भारत घडविण्यामध्ये संस्था, नेतृत्व आणि नागरिकांची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला. सार्वजनिक जीवन, संस्कृती, शिक्षण, सामाजिक जबाबदारी आणि देशाच्या बदलत्या अपेक्षा यांसंदर्भातील विविध विषयांवरही यावेळी विचारमंथन झाले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. व्ही. भागय्या, अमृता हॉस्पिटल, फरिदाबादचे आध्यात्मिक संचालक स्वामी निजात्मानंद पुरी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, गोरखपूरचे खासदार व अभिनेते श्री. रवि किशन, अभिनेते श्री. नितीश भारद्वाज, महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री श्री. नितेश राणे, सीमांत सेवा फाउंडेशनचे सचिव श्री. सिद्धार्थ पटनी, महिला उद्योजक श्रीमती छाया नंजप्पा आणि एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशीष कुमार चौहान उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात पाञ्चजन्यचे संपादक श्री. हितेश शंकर म्हणाले, “या संवादासाठी मुंबई हे योग्य ठिकाण आहे. परकीय आक्रमणे एखाद्या राष्ट्रासमोर आव्हान निर्माण करू शकतात; मात्र त्या राष्ट्राची जिद्द आणि विकासाची इच्छाशक्ती कमकुवत करू शकत नाहीत, याचे मुंबईचा इतिहास हे जिवंत उदाहरण आहे. ‘सुशासन संवाद’च्या माध्यमातून प्रगतिशील आणि अर्थपूर्ण चर्चेद्वारे आपल्या समोर असलेल्या सामाजिक प्रश्नांवर नवीन उत्तरे शोधण्याच्या दिशेने योगदान देण्याचा पाञ्चजन्य चा प्रयत्न आहे. भारत २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पनेकडे वाटचाल करत असताना अशा संवादांचे महत्त्व अधिक वाढते. समाजावर चित्रपट आणि ओटीटी माध्यमांचा बदलता प्रभाव असो किंवा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून चालविले जावे का, यासारखे प्रश्न असोत; आपल्या समाजाला आकार देणाऱ्या या विषयांचा खुलेपणाने, जबाबदारीने आणि दीर्घकालीन राष्ट्रीय दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे.”
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा म्हणाले, “विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक विकास किंवा आर्थिक मूल्यामध्ये वाढ नव्हे. सरकारी धोरणांचा शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोच होणे आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा लाभ पोहोचणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तींसाठी सरकारी धोरणे तयार केली जातात, त्यांच्यापर्यंत ती पोहोचली तरच विकसित भारताचा खरा अर्थ साकार होईल. यासाठी सरकार आणि समाज यांच्यात सुसूत्र समन्वय आणि भागीदारी आवश्यक आहे, हेच सुशासनाचे सार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सरकार आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शासनव्यवस्था प्रभावी होऊ शकत नाही.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला उद्योजकता, नवकल्पना आणि लोकसहभागाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. राज्याच्या विकासाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करताना या सामर्थ्यांची प्रभावी संस्था आणि जनतेच्या गरजांना प्रतिसाद देणाऱ्या शासनव्यवस्थेशी सांगड घालणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे.
कौशल्याधारित शिक्षण आणि उद्योगांच्या सहभागातून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही कौशल्य आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करत आहोत. तसेच नवीन उद्योग, नवउद्योजकांना पाठबळ आणि विद्युत वाहनांसारख्या भविष्यातील उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीद्वारे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण केल्या जात आहेत. आमच्या आश्वासनांमध्ये आणि आमच्या उद्दिष्टांमध्ये कोणताही फरक नाही; आमच्या वचनांची प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतरण करणे हेच आमचे लक्ष आहे.
त्याचबरोबर जागतिक हवामान बदलासह मानवतेसमोर गंभीर सामाजिक आव्हाने आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जेचा अधि…





