मुंबई, १९ ऑक्टोबर २०२६ : एल अँड टी फायनान्स लिमिटेडने (LTF) ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत ९७५ कोटी रुपयांचा विक्रमी एकत्रित करपश्चात नफा (PAT) नोंदवला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा एकत्रित कर्ज पोर्टफोलिओ २८ टक्क्यांनी वाढून १,३६,६३५ कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.
या तिमाहीत कंपनीचा किरकोळ कर्ज पोर्टफोलिओ २९ टक्क्यांनी वाढून १,३४,६०० कोटी रुपये झाला. किरकोळ कर्जवितरणातही २७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून, या कालावधीत २४,०२७ कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा, कर्जावरील खर्चात घट आणि मालमत्तेवरील परताव्यात वाढ यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे.
कंपनीने २०३१ पर्यंत जोखीम व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित किरकोळ वित्तीय सेवा संस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्राहक मिळवणे, पतमूल्यांकन, कर्जपोर्टफोलिओ व्यवस्थापन, ग्राहक सेवा आणि क्रॉस-सेलिंग अशा विविध प्रक्रियांमध्ये एआयचा वापर वाढवण्यात येत आहे.
कंपनीच्या प्लॅनेट अॅपने २.७ कोटींहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे. ग्राहकांच्या एकूण सेवा विनंत्यांपैकी ९४ टक्के विनंत्या या ॲपद्वारे पूर्ण केल्या जातात. तिमाहीत ॲपच्या माध्यमातून २,१६८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली, तर ५,९३४ कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण झाला. ग्रामीण ग्राहकांसाठी ॲपमध्ये विशेष इंटरफेस विकसित करण्यात आला असून, हिंदीसह अनेक भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
डीलर्ससाठी विकसित केलेल्या पार्टनर प्लॅनेट अॅपद्वारे व्यवसायाची कामगिरी, ट्रेड अॅडव्हान्स आणि कार्यात्मक विनंत्यांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होते. यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होत आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप्ता रॉय म्हणाले की, सर्व प्रमुख व्यावसायिक निकषांमध्ये कंपनीने दमदार कामगिरी केली आहे. गोल्ड फायनान्स, मालमत्तेच्या तारणावर आधारित सूक्ष्म कर्ज, वैयक्तिक कर्जे आणि दुचाकी वित्तपुरवठा या क्षेत्रांचा विस्तार करण्यात येत आहे. भविष्यात पतमूल्यांकन, जोखीम नियंत्रण आणि वसुली व्यवस्थेवर अधिक भर दिला जाणार आहे.
कंपनीने शाखांचे जाळे विस्तारण्यासोबतच डिजिटल माध्यमांतून ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. एआयमधील गुंतवणुकीमुळे कर्जविषयक निर्णय अधिक सक्षम करणे, संभाव्य जोखीम लवकर ओळखणे आणि कार्यात्मक कार्यक्षमता वाढवणे अपेक्षित आहे. शाश्वत नफावाढ, सुधारित परतावा आणि कर्जपोर्टफोलिओची गुणवत्ता टिकवणे हे कंपनीचे प्रमुख प्राधान्य राहणार आहे.





