वसई: मुलाकडून सतत होणारी मारहाण व मानसिक त्रासाला कंटाळून ८४ वर्षीय वृद्धाने लोकलखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वसईत घडली. गॅब्रिअल डॉमिनिक कुटिनो असे मृत वृद्धांचे नाव असून त्यांचा मुलगा शाम व त्याच्या साथीदाराविरोधात भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गॅब्रिअल कुटीनो हे वसई पश्चिमेतील सांडोर परिसरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा शाम हा गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून आपल्या वयोवृद्ध वडिलांना मारहाण, शिवीगाळ व मानसिक त्रास देत होता. त्रासाला कंटाळून काही काळ गॅब्रिअल हे आपल्या मुलीकडे राहण्यासाठी गेले होते. मात्र, मे २०२६ मध्ये शाम आणि त्याच्या सागर नावाच्या साथीदाराने मध्यस्थी करून त्यांना पुन्हा घरी आणले. मात्र, त्यानंतरही या दोघांनी वृद्धाचा छळ सुरूच ठेवला. त्यांना जेवण न देणे, घरातून बाहेर पडू न देणे आणि मारहाण करण्याचे प्रकार सुरूच ठेवले होते.
त्यानंतर सततच्या छळाला कंटाळलेल्या गॅब्रिअल कुटीनो यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. २८ सप्टेंबर रोजी सकाळी वृद्धाने आपल्या मुलीची भेट घेऊन तिच्याकडे मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, रोख रक्कम आणि एक सुसाईड नोट असलेली पिशवी सोपवली. या चिठ्ठीमध्ये “मी मुलगा शाम व सागर या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे,” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.
पिशवी देऊन निघून गेल्यानंतर काही वेळातच गॅब्रिअल कुटीनो यांनी नायगाव रेल्वे स्थानकात लोकलखाली उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर मृत वृद्धाची मुलगी रूपा नोएल चिरायत यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत आरोपी शाम कुटीनो आणि सागर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शुल्लक कारणावरून मारहाण
काही दिवसांपूर्वी अंड्याचे कवच डायनिंग टेबलवर राहिल्याच्या शुल्लक कारणावरून वाद घालत भावाने वडिलांना मारहाण केल्याचा तसेच वडील मुलीकडे राहायला आले असताना बंद घराचे कुलूप तोडून घरात बळजबरीने शिरून शाम याने ताबा मिळवण्याची माहितीगॅब्रिअल कुटीनो यांच्या मुलीने पोलिसांना दिली.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
तसेच यापूर्वी मुलाला घाबरून वडिलांनी घराचा दरवाजा लावून घेतला असता घराच्या खिडकीतून लोखंडी सळी टाकून वडिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न मुलाने केला असल्याची चित्रफितही समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती.





