प्रतिनिधी मानस : शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी (दि. २३) रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हिंसक हाणामारी झाली. या घटनेत तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने दोघांचा मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडामुळे यवतमाळ शहरात मोठी खळबळ उडाली असून, घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी झालेल्या हल्ल्यात अभय ऊर्फ मित्तम पाठोडे (रा. राजुरवाडी, घाटंजी; सध्या रा. उमरसरा) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जाधव नावाची दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अवधूतवाडी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गंभीर जखमी जाधव याला पुढील उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या दोन झाली.
हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेतील मृत अभय ऊर्फ मित्तम पाठोडे याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर दोन वेळा महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती मिळाली आहे.
मात्र, शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले असून, त्यांना शोधून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्याकांडामागील कारण आणि संबंधित आरोपींची माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
या रक्तरंजित घटनेमुळे उमरसरा परिसरासह संपूर्ण यवतमाळ शहरात चर्चेला उधाण आले आहे.





