मुरूम माफियांची मुजोरी! महसूल पथकाचा रस्ता मुरूम टाकून अडवला; २७०० ब्रास उत्खननाचा दावा

By: Editor_Manas

On: Friday, October 23, 2026 3:41 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी मानस : कनेरसर (ता. खेड) येथील हजारेवस्ती परिसरात तब्बल २७०० ब्रास मुरूमाचे अनधिकृत उत्खनन करून चोरी केल्याचा आरोप महसूल विभागाच्या फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाच्या वाहनांसमोर हायवातून मुरूम टाकून रस्ता अडविण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडल अधिकारी शिला शेवाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गणेश साहेबराव हजारे (रा. कनेरसर), सुयोग पांडुरंग पानसरे (रा. पाबळ, ता. शिरूर), स्कुटीवरील दोन अनोळखी व्यक्ती, हायवा चालक आणि दोन जेसीबी चालक अशा सात जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पाठलागादरम्यान रस्त्यावर टाकला मुरूम

फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. २२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, मंडल अधिकारी शिला शेवाळे, संबंधित ग्राममहसूल अधिकारी आणि कर्मचारी असे पथक अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी राजगुरुनगर येथून पाबळ रस्त्याने जात होते.

सायंकाळी सातच्या सुमारास निमगाव हद्दीतील खेड सिटी परिसरात मुरूमाची वाहतूक करणारी हायवा गाडी पथकाच्या निदर्शनास आली. पथकाने या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी हायवाच्या मागून आलेल्या स्कुटीवरील दोन व्यक्तींनी पथकाच्या वाहनांसमोर स्कुटी आडवी लावून रस्ता अडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतरही पथकाने हायवाचा पाठलाग सुरू ठेवला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास रेटवडी येथील कॅनॉल रस्त्यावर हायवा चालकाने गाडीतील मुरूम रस्त्यावर टाकला. त्यामुळे पथकाच्या वाहनांचा मार्ग अडवला गेला. या घटनेनंतर हायवा चालक गाडीसह तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शासकीय संपादित जमिनीत उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास

यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास महसूल पथक कनेरसर येथील हजारेवस्ती परिसरातील एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक १४८६ येथे पोहोचले. त्या ठिकाणी दोन जेसीबीच्या साहाय्याने मुरूमाचे उत्खनन सुरू असल्याचे पथकाला आढळले.

महसूल पथकाची वाहने दिसताच जेसीबी चालकांनी यंत्रे सुमारे २०० मीटर अंतरावर नेऊन उभी केली आणि तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित ठिकाणी अंदाजे २७०० ब्रास मुरूमाचे उत्खनन करून त्याची चोरी केल्याचा दावा महसूल विभागाने केला आहे.

जेसीबी आणि हायवाबाबत माहिती

घटनास्थळी उपस्थित असलेल्या गणेश हजारे याच्याकडे जेसीबीबाबत विचारणा केली असता, संबंधित जेसीबी स्वतःचे असून हायवा गाडी सुयोग पानसरे याची असल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 23, 2026

October 23, 2026

October 23, 2026

October 23, 2026

October 22, 2026

October 22, 2026