नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२६ : भारत फोर्ज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि एफएन ब्राउनिंग ग्रुपची पूर्ण मालकीची उपकंपनी एफएन हर्स्टल यांनी आज भारताच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक उत्पादन आणि औद्योगिक सहकार्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला. या भागीदारीमुळे भारतातील सहा दशकांचा प्रगत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाधारित मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचा अनुभव, तसेच लघु शस्त्रे आणि एकात्मिक शस्त्रप्रणाली क्षेत्रातील एफएन हर्स्टलच्या १३५ हून अधिक वर्षांचा जागतिक अनुभव यांचा संगम साधला जाणार आहे.
या सामंजस्य करारानुसार भारतात स्वतंत्र उत्पादन केंद्र उभारण्याच्या शक्यतेचा केएसएसएल आणि एफएन हर्स्टल संयुक्तपणे अभ्यास करतील. याशिवाय, भारतीय बाजारपेठेसाठी संरक्षणविषयक उत्पादने तयार करण्यासाठी दोन्ही कंपन्या धोरणात्मक भागीदारी किंवा संयुक्त उपक्रम उभारण्याचाही विचार करणार आहेत. यामध्ये लघु शस्त्रे, एकात्मिक शस्त्रप्रणाली आणि मानवरहित हवाई प्रणालींविरोधी (सी-यूएएस) उपाययोजनांचा समावेश असेल. हा उपक्रम भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगत आहे. स्थानिक उत्पादन, तंत्रज्ञानाचे सहकार्य आणि मूल्यनिर्मिती यांच्या माध्यमातून देशांतर्गत क्षमता विकसित करण्याचा दोन्ही कंपन्यांचा समान उद्देश यातून दिसून येतो. यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल आणि संरक्षण खरेदी कार्यक्रमांमध्ये देशांतर्गत सहभाग वाढण्यास मदत होईल. भारतीय सशस्त्र दलांसाठी याचा अर्थ महत्त्वाच्या संरक्षण प्रणालींचा दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित होणे आणि संरक्षण सज्जतेसाठी आवश्यक असलेल्या या क्षेत्रात अधिक धोरणात्मक स्वावलंबन प्राप्त होणे असा आहे.
‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, “जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, उत्पादने आणि उत्पादन क्षेत्रातील कौशल्य भारतात आणण्यासाठी एफएन हर्स्टलसोबत भागीदारी करताना ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स’ला (केएसएसएल) अभिमान वाटतो. एफएन हर्स्टलच्या जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या उत्पादनसंचाचा आणि अनेक दशकांच्या अनुभवाचा, तसेच ‘केएसएसएल’च्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादन क्षमतेचा संगम घडवून आम्ही भारतातून भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी प्रगत संरक्षण उपाययोजना उपलब्ध करून देणारे एक सक्षम व्यासपीठ उभारीत आहोत. स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांद्वारे भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला चालना देणे, देशांतर्गत क्षमता वाढवणे आणि ‘आत्मनिर्भर भारता’चे उद्दिष्ट पुढे नेणे, हा आमचा प्रयत्न आहे.”
‘एफएन ब्राउनिंग ग्रुप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलियन कॉम्पेरे म्हणाले, “एफएन हर्स्टलसाठी भारत हा एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे आणि ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स’सोबत हे महत्त्वाचे पाऊल उचलताना आम्हाला आनंद होत आहे. या करारामागे एक समान उद्दिष्ट आहे. जगातील अत्यंत सक्षम सशस्त्र दलांचा विश्वास संपादन केलेल्या ‘एफएन हर्स्टल’च्या सिद्ध संरक्षण उपाययोजना आणि ‘केएसएसएल’च्या उत्कृष्ट औद्योगिक क्षमता यांचा संगम घडवून भारतीय सशस्त्र दलांसाठी दीर्घकालीन स्वदेशी क्षमता विकसित करण्यास मदत करणे हे त्यामागील उद्दिष्ट आहे. स्थानिक उत्पादन, तंत्रज्ञान सहकार्य आणि प्रगत संरक्षण क्षमता विकसित करण्याच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’च्या उद्दिष्टांना पाठबळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामुळे भारत, भारतीय सशस्त्र दल आणि आमच्या दोन्ही कंपन्या या सर्वांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती होईल.”
या सामंजस्य करारानुसार, भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विविध सहकार्य प्रकल्पांच्या शक्यतांचा दोन्ही कंपन्या संयुक्तपणे अभ्यास करतील आणि आढावा घेतील.





