पुरंदरला अवैध व्यवसायांचा विळखा; जुगार, मटका, दारू विक्रीने नागरिक त्रस्त

By: Editor_Manas

On: Friday, June 12, 2026 4:15 PM

Google News
Follow Us

परिंचे : पुरंदर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात विविध अवैध व्यवसाय फोफावत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुगार, मटका, बेकायदेशीर दारू विक्री, ताडीच्या नावाखाली होणारी भेसळ, हुक्का पार्लर आणि खासगी सावकारकीच्या वाढत्या जाळ्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, पोलिस यंत्रणा आणि महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यातील अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर बेकायदेशीररीत्या मद्यविक्री केली जाते. विविध गावांमध्ये जुगार आणि मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ताडीच्या नावाखाली रसायनमिश्रित पेये विकली जात असल्याचाही आरोप असून, काही ठिकाणी हुक्का पार्लरचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.

या अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून चोरी, हाणामारी, दहशत निर्माण करणे आणि कोयत्याच्या धाकाने धमकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

खासगी सावकारकीचे वाढते जाळे

तालुक्यातील अनेक गावांमध्ये खासगी सावकारांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवली असल्याचा आरोप होत आहे. शेतकरी, लघुउद्योजक आणि आर्थिक अडचणीत असलेले नागरिक या सावकारांच्या जाळ्यात अडकत असून त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही अनेकदा ठोस कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नव्या पोलिस निरीक्षकांसमोर मोठे आव्हान

सासवड पोलिस ठाण्यात नुकतेच नवीन पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांसमोर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांशी संवाद वाढवून त्यांचा विश्वास संपादन करणे, तक्रारींवर तत्काळ कारवाई करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन

सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले की, “तालुक्यात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत. नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधावा. विशेषतः अवैध खासगी सावकारांविरोधात तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

तालुक्यातील वाढत्या अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026