Pune Crime : चारित्र्याच्या संशयातून ‘लिव्ह-इन’मधील तरुणीचा खून

By: Editor_Pratik

On: Tuesday, June 2, 2026 12:32 PM

Google News
Follow Us

पुणे – चारित्र्याच्या संशयावरून एका २६ वर्षीय तरुणीचा तिच्यासमवेत ‘लिव्ह-इन’मध्ये एकत्र राहणाऱ्या जोडीदाराने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीचा खून केल्यानंतर तो घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. घरातून दुर्गंधी सुटल्यानंतर एक जून रोजी हा प्रकार उघडकीला आला.

रिहाना खातून (वय २६, रा. शिवअस्मी बिल्डिंग, आव्हाळवाडी रस्ता, वाघोली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी मूळची पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. याप्रकरणी इम्रान राजेसाब बोदले खान (रा. आदर्शनगर, लोहगाव) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रवी समीर वैराळ असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रिहाना खातून आणि आरोपी रवी वैराळ हे दोघे वाघोलीतील आव्हाळवाडी रस्ता परिसरात एकत्र राहत होते. मात्र, काही महिन्यांपासून आरोपी रिहानाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. २८ मे रोजी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने तिला बेदम मारहाण करून तिचा खून केला.

गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह घरातच ठेवून बाहेरून कुलूप ठोकून तो पसार झाला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने इमारतीमधील रहिवाशांना संशय आला. रहिवाशांनी तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंद घराचे कुलूप तोडले. आत प्रवेश केला असता रिहानाचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहाय्यक आयुक्त नूतन पवार आणि वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय चंदन करत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026