पर्यावरण संवर्धनासाठी मुखाईवनमध्ये ३०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

By: Editor_Manas

On: Monday, June 8, 2026 8:55 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, शिरूर : पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनासाठी मुखाईवन येथे ३०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वनराई संस्था, इनव्हॅलिअर कंपनी आणि मुखाई ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध देशी प्रजातींच्या वृक्षांसह फळझाडांची लागवड करण्यात आली.

मुखाईवन प्रकल्पांतर्गत यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले असून, या मोहिमेनंतर परिसरातील एकूण वृक्षसंख्या २,५०० हून अधिक झाली आहे. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन, संरक्षण आणि देखभाल नियोजनबद्ध पद्धतीने केली जात असल्याने परिसरातील हिरवाईत लक्षणीय वाढ झाली आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक जैवविविधतेला चालना मिळत असून विविध पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि इतर वन्यजीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण होत आहे. वाढते तापमान नियंत्रित ठेवणे, मृदा संवर्धन, भूजल पातळी सुधारणे आणि हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमास इनव्हॅलिअर कंपनीचे बिझनेस डायरेक्टर निलेश कुकल्येकर, ऑपरेशन्स व सप्लाय चेन डायरेक्टर उदय शेट्टी, मानव संसाधन व्यवसाय भागीदार सुस्मिता मिश्रा तसेच मानव संसाधन व्यवस्थापक नितीन पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. कंपनीच्या सुमारे ३० कुटुंबांनीही या वृक्षारोपण मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वनराई संस्थेचे प्रकल्प प्रमुख राकेश शेलार, पर्यावरण तज्ज्ञ मयूर भागवत आणि ऑन-साइट कर्मचारी दिलीप मोरे यांचा इनव्हॅलिअर कंपनीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, टीम वनराईचे सदस्य, मुखाई ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण तज्ज्ञ सायली पलांडे यांनी पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकासामध्ये वृक्षांचे महत्त्व विशद केले.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वही या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणारा मुखाईवन प्रकल्प हा पर्यावरण संवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरत असून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 8, 2026

June 8, 2026

June 8, 2026

June 8, 2026

June 8, 2026

June 7, 2026