पर्यावरण रक्षणासाठी पद्मा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद; प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

By: Editor_Manas

On: Wednesday, June 10, 2026 10:28 AM

Google News
Follow Us

पुणे: पर्यावरणाचा समतोल राखून भावी पिढीला सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यायचे असेल, तर मोठ्या प्रमाणात झाडे लावून ती जागवायला हवीत. प्रत्येकाने एक झाड लावून या उपक्रमात सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. आईप्रमाणेच माणसाच्या जगण्याला निःस्वार्थपणे श्वास व मायेची सावली देणाऱ्या वृक्षांप्रती आपण कायम कृतज्ञ राहायला हवे, तसेच पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांचे पर्यावरण क्षेत्रातील कार्याचे तरुणांनी अनुकरण करावे, असे आवाहन पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले. 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पद्मा फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत ५,००० झाडे लावण्याच्या अभियानाचा शुभारंभ प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. सिंहगड रस्त्यावरील मॉंटेरोसा सोसायटीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका वर्षा तापकीर, नगरसेविका ज्योती गोसावी, उद्योजक तुषार गोसावी, उद्योजक जवाहर चोरगे, मुख्याध्यापिका अनुराधा निकम,  वारकरी आचारसंहिता परिषदेचे मुख्य प्रवर्तक निलेश महाराज झरेकर, संयोजक व पद्मा फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यात सक्रिय ‘माणुसकीची चळवळ’ संस्थेचे राज देशमुख, पर्यावरण संवर्धनात कार्यरत सुनील चोरे, सचिन गजरमल, श्रद्धा शिरोडे, वृक्षारोपणासाठी जागा देणारे दत्ता मोरे, दृष्टीहीन असूनही बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या संस्कृती चव्हाण, वुशू संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल निसर्ग सेवा संस्था व वारजे वन उद्यान पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

परशुराम वाडेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ झाड लावताना त्यात आईच दिसत असल्याचे सांगून तिच्याप्रमाणेच हे झाड सर्वांना सावली देईल, अशी भावना व्यक्त केली. वर्षा तापकीर यांनी हवामान बदलांवर मात करायची असेल, तर झाडांचे संवर्धन करायला हवे, असे सांगितले. ज्योती गोसावी यांनी पती किशोर गोसावी यांच्या स्मरणार्थ हे झाड लावले असून, हा क्षण माझ्यासाठी संस्मरणीय असल्याचे सांगितले. 

पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि वृक्षारोपणाद्वारे हरित पुण्याच्या निर्मितीस हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे शशिकांत कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन जीवराज चोले यांनी केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 10, 2026

June 10, 2026

June 10, 2026

June 10, 2026

June 10, 2026

June 9, 2026