अनुकरणीय गणेशोत्सवासाठी समाजोपयोगी उपक्रमांची गरज : मंदार लवाटे

By: Editor_Manas

On: Monday, June 8, 2026 3:49 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पुणे : गणेशोत्सव ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. पेशव्यांच्या काळापासून ते विविध समाजघटकांपर्यंत गणेशोत्सव साजरा होत आला आहे.  प्लेगची साथ असो वा पानशेत धरण फुटीचे संकट, गणेशोत्सव कधीच थांबला नाही आणि भविष्यातही त्यात खंड पडणार नाही. अनुकरणीय गणेशोत्सवासाठी समाजोपयोगी उपक्रमांची गरज असते असे प्रतिपादन इतिहासकार, लेखक आणि संशोधक मंदार लवाटे यांनी केले.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या पर्यावरण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘रोटरी माय सिटी माय प्रॉमिस’ या शिस्त व पर्यावरणपूरक वर्तन बदल अभियानाच्या तसेच जय गणेश व्यासपीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अनुकरणीय गणेशोत्सव २०२६ – मार्गदर्शन शिबिर’ मध्ये ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. मिलिंद भोई, संगणकतज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, चंद्रशेखर भेडा, मनोज धारप, शैलेन्द्र गाडेकर, विष्णू भेडा, पियुष शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

लवाटे म्हणाले, “गणेशोत्सवात भक्तीची सर्वात मोठी लाट अनुभवायला मिळते. आषाढ महिन्यात सुरू झालेली ही भक्तीची भावना भाद्रपद पौर्णिमेच्या सुमारास सर्वोच्च बिंदूला पोहोचते.  पुण्यातील गणेशोत्सवाचा इतिहास  जुना असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीही विविध ठिकाणी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जात होता. गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच समाजोपयोगी कार्यात योगदान दिले आहे. भविष्यातही ही परंपरा अधिक व्यापक व्हावी.”

डॉ. दीपक शिकारपूर यांनी गणेशोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ते म्हणाले, “प्रत्येक गणेश मंडळाने स्वतःचा AI चॅटबॉट विकसित करावा. त्यामुळे मंडळाची माहिती विविध भाषांमध्ये सहज उपलब्ध होईल. उत्सवकाळातील गर्दी व्यवस्थापन, ‘लॉस्ट अँड फाऊंड’ सेवा तसेच संभाव्य धोके ओळखून त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी AI प्रभावी ठरू शकते.”

डॉ. मिलिंद भोई म्हणाले, “गणेशोत्सवानंतर अनेक पोलीस कर्मचारी, विक्रेते तसेच मिरवणूक मार्गांवरील नागरिक आरोग्याच्या तक्रारींसह डॉक्टरांकडे जातात. बहिरेपणा, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तसेच लेझर लाईटमुळे डोळ्यांशी संबंधित १८ प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यापैकी १२ आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत.”

गणेशोत्सवाचे विधायक आणि संस्कारक्षम स्वरूप जपण्यासाठी गणेश मंडळे व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “पुण्याचा गणेशोत्सव हळूहळू व्यावसायिकतेकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. हे बदलण्यासाठी सुरू झालेला हा प्रयत्न स्वागतार्ह असून रोटरी संस्थेची साथ महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रशेखर भेडा यांनी पारंपारिक हस्तकले चा वापर करून देखावे करण्याबाबत नवनवीन कल्पना सुचवल्या. कमी खर्चात आणि उपलब्ध साहित्यातून कशी आरास करावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. तर  मनोज धारप यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरवात रोटेरिअन विष्णू भेडा यांनी ‘रोटरी माय सिटी माय प्रॉमिस’ या संकल्पनेची मांडणी केली.  कार्यक्रमाच्या समारोपावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ पर्यावरण विभागाचे प्रमुख राजेंद्रकुमार सराफ, महेश सूर्यवंशी, सूर्यकांत पाठक, रवींद्र (अण्णा) माळवदकर, शिरीष मोहिते, उदय जगताप, बाळासाहेब मारणे,  विश्वास भोर, बबलू रमजानी  आदी मान्यवरांच्या चर्चासत्राने शिबिराची सांगता झाली. यावेळी 100 मंडळानी प्लाझ्मा मुक्त गणेशोत्सव करावा अशी मागणी केली, तसेच  यंदाच्या गणेशोत्सवात मंडळे  निर्माल्याचे  खतात रूपांतर करण्यासाठी  रोटरी 3131 सहकार्य करणार आहेत.  शिबिरात शंभरहून अधिक मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोटेरिअन महेश भागवत यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप पाटील तसेच रोटेरिअन लीना कारंडे, रेणुका माडीवाले, पृथ्वीराज पाटील, विशाल कुलकर्णी व सुनीता भेडा यांचे आयोजनात मोलाचे योगदान होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 6, 2026

July 6, 2026

July 6, 2026

school-holidays-1-jpg-1731597974

July 6, 2026

July 5, 2026

July 4, 2026