दिल्लीत E85 फ्लेक्स फ्युएलचे लाँचिंग; E20 पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपये स्वस्त

By: Editor_Manas

On: Saturday, June 6, 2026 12:29 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, नवी दिल्ली : देशातील पर्यायी इंधन क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत 85 टक्के इथेनॉल मिश्रित E85 फ्लेक्स फ्युएल अधिकृतपणे बाजारात दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते दिल्लीतील पूसा रोड येथील इंडियन ऑइलच्या (IOC) पहिल्या E85 इंधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

विशेष म्हणजे, दिल्लीमध्ये E85 इंधनाची किंमत 82.12 रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आली असून ते सध्या उपलब्ध असलेल्या E20 पेट्रोलपेक्षा जवळपास 20 रुपये प्रति लिटर स्वस्त आहे. त्यामुळे वाहनधारकांचा इंधन खर्च कमी होण्यास मदत होणार असून देशाचे कच्च्या तेलावरील अवलंबित्वही घटण्याची अपेक्षा आहे.

E85 साठी स्वतंत्र ब्रँडिंग

ग्राहकांची दिशाभूल होऊ नये यासाठी E85 इंधन देणाऱ्या डिस्पेंसरवर स्वतंत्र ब्रँडिंग आणि स्पष्ट ओळख दर्शविणारी लेबले लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना इंधनाची निवड करताना कोणताही गोंधळ होणार नाही.

2027 पर्यंत 5,000 केंद्रांचे लक्ष्य

दिल्लीतील पूसा रोड हे देशातील पहिले E85 इंधन केंद्र असले तरी सरकारची योजना मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर तसेच मुंबई-पुणे-नागपूर मार्गावरील 50 ते 100 केंद्रांवर E85 इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

यावर्षाअखेरीस देशभरात सुमारे 500 E85 केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट असून 2027 च्या अखेरीपर्यंत ही संख्या 5,000 पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे.

E85 इंधनात काय विशेष?

सध्या देशात उपलब्ध असलेल्या E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असते. मात्र, नव्याने सुरू करण्यात आलेल्या E85 इंधनामध्ये 85 टक्क्यांपर्यंत इथेनॉल आणि केवळ 15 टक्के पेट्रोल असते.

सरकार भविष्यात E100 म्हणजे 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या इंधनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होऊन देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.

शेतकऱ्यांनाही फायदा

इथेनॉल हे ऊसाचा रस, मका, खराब झालेले धान्य आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार केले जाते. त्यामुळे त्याची निर्मिती तुलनेने स्वस्त असून शेतकऱ्यांसाठीही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. तसेच या इंधनामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरणालाही फायदा होतो.

सर्व वाहनांसाठी नाही

E85 इंधनाचा वापर सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये करता येत नाही. यासाठी वाहनांमध्ये विशेष फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे.

सध्या भारतात फ्लेक्स-फ्यूल तंत्रज्ञानावर आधारित काही निवडक वाहने विकसित करण्यात आली आहेत. यामध्ये मारुती सुझुकीची फ्लेक्स-फ्यूल वॅगनआर, हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडर प्लस आणि HF डिलक्सच्या फ्लेक्स-फ्यूल आवृत्त्या तसेच सुझुकी जिक्सर SF यांचा समावेश आहे.

कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न

जागतिक पातळीवर वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि आयात खर्चाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देत आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 90 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे इथेनॉलसारख्या स्वदेशी इंधनाचा वापर वाढवून आयात खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऊर्जा सुरक्षेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी पर्यायी इंधनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026