पुणे, मे २०२६ : ‘बालनाट्य महोत्सव’ हा उपक्रम हा उद्याच्या मोठ्या कलाकारांची जडणघडण होण्याची नांदी असून त्यातूनच बालरंगभूमी विकसित होईल, असे विचार कॉस्मिक कॅनव्हास स्टुडीओज तर्फे आयोजित कार्यक्रमात आलेल्या मान्यवर पाहुण्यांनी व्यक्त केले. या महोत्सवात स्वच्छंद पुणे संस्थेमार्फत बसवण्यात आलेल्या राज्य बालनाट्य व इतर स्पर्धांमध्ये सर्वाधिक ३३ पारितोषिके मिळवलेले ‘कठपुतली’ या नाटकासह ‘पक्ष्यांचे कविसंमेलन’ आणि ‘ढग रंगीत झाले’ ही नाटकेही सादर झाली. भरत नाट्य मंदिरात झालेल्या या सोहळ्यास मोठ्या संख्येने बालकलाकार व त्यांचे पालक उपस्थित होते.
या बालनाट्य महोत्सवाला तुळशीबाग गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडीत, साईनाथ मंडळाचे पियुष शहा, अभिनेते, गायक व कीर्तनकार वज्रांग आफळे आणि प्रसिद्ध बाल साहित्यिक राजीव तांबे, शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे आशुतोष देशपांडे उपस्थित होते. तसेच शिक्षिका निवेदिता मेहेंदळे, ‘कठपुतली’च्या लेखिका संध्या कुलकर्णी, कॉस्मिक कॅन्व्हॉस स्टूडीओजचे संचालक प्रणव भुरे, गौरव छत्रे, स्वच्छंद पुणेच्या अमृता जोगदेव आणि मुग्धा वडके उपस्थित होते.
बालनाट्य महोत्सवातील ‘कठपुतली’ आणि अन्य नाटकांमध्ये सहभागी झालेल्या कलावंत तसेच मंचामागील कलाकारांचे कौतुक स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आले. त्यामध्ये दियारा वाणी, शिवांश देशमुख, अर्चिस थत्ते, तनिष्का बोकील, सौम्या बोकील, नील देशपांडे, अद्विका वाळुंज, मल्हार इनामदार, अक्षरा जोशी, अवनी कैसकर, श्रीराम पुरंदरे, श्रावणी जोशी, विष्णू जोशी, नाट्यभूषाकार स्मिता केळकर, तसेच बॅकस्टेज कलावंत मानसी कोकीळ, केतकी जोशी, राधिका थत्ते, पार्थ कोकीळ इत्यादी बालकलावंतांचा समावेश होता.
अमृता जोगदेव म्हणाल्या की, ‘कठपुतली’ हे नाटक राज्य बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीत पुणे विभागातून पहिले आले, तर अंतीम फेरीत दुसरे आले असून या नाटकातील अभिनय, दिग्दर्शन, रंगभूषा, संगीत, नैपथ्य, प्रकाश योजना, सांघिक, अशा बहुतेक सर्व गोष्टींमध्ये मिळून ३३ पेक्षा जास्त पारितोषिके मिळाले असून आजवरच्या बालनाट्य स्पर्धेतील तो उच्चांक आहे.
प्रणव भुरे म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी बालनाट्य स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर बालरंगभूमीसाठी काही ठोस करण्याची इच्छा झाली. यामध्ये आपल्याला गौरव छत्रे, चिन्मयी कुलकर्णी आणि स्वयंम पवार यांची साथ लाभली. स्वच्छंद पुणे तर्फे आजवर बालकांसाठी नाट्यशिबीर घेतले जात असून आता वर्षभरासाठी अभिनय प्रशिक्षण वर्गही सुरू करत आहोत.
शिकण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू दोन बालकलाकारांना नाट्यकला शिकण्यासाठी शिष्यवृत्ती लवकरच देत आहोत. याशिवाय ‘सांगतो ऐका’ हा लहान मुलांसाठीचा स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉम लवकरच सुरू करण्यात येत आहे. यातून बालकलावंत घडावेत आणि त्यांना नाट्यकला क्षेत्रात अधिक शिकण्यास मिळावे हे उद्दिष्ट आहे.
पियुष शहा म्हणाले की, रंगमंचकला ही सर्वोत्तम कला असून त्यामध्ये अभिनय, नृत्य तसच अन्य कलाप्रकारांचा समावेश असतो.
राजीव तांबे यांनी म्हणाले की, बालनाट्याबरोबर यापुढे भविष्यात पालक-बालकनाट्य महोत्सवही घ्यायला हवेत. त्यामध्ये पालकांनी नाटकात काम करावं, तर मुलांनी ते दिग्दर्शित करावं. त्यातून नाटक करताना मुलांना काय काय करावं लागतं हे पालकांना कळेल. त्यातून पालक व मुलांचे ‘बाँडींग’ वाढीस लागेल.





