‘आयएमडीआर’ला पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ‘अकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर’ पुरस्कार

By: Editor_Manas

On: Friday, May 29, 2026 6:52 AM

Google News
Follow Us

पुणे: इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (आयएमडीआर) संस्थेला ‘अकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या (पीएमए) ४९ व्या स्थापन दिन कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व ‘आयएमडीआर’च्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रसंगी प्रा. डॉ. अभिजित शिवणे, प्रा. डॉ. सुरज कांबळे, प्रा. डॉ. सन्मथ शेट्टी, प्रा. डॉ. सोनाली खुरजेकर उपस्थित होते. व्यवस्थापन शिक्षण, शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योग क्षेत्राशी असलेले दृढ संबंध, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील संस्थेच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत ‘आयएमडीआर’ला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, पित्ती उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पित्ती, पूना ॲब्रेसिव्हजचे संस्थापक व अध्यक्ष वीरेंद्र सूद, बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक प्रसेनजीत फडणवीस यांनी कार्यक्रमात ‘विकसित भारत’ संकल्पनेवर मार्गदर्शन केले. ‘पीएमए’चे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदिप तुपे व राहुल जोशी उपस्थित होते. ‘आयएमडीआर’सह द इंडस आंत्रप्रेन्युअर्स, स्वरूपवर्धिनी, महाट्रेनर्स या संस्थांचा, तसेच प्रशांत बोरा, श्वेता शालिनी, गौरव त्रिपाठी यांचा गौरव करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत जगदीश कदम म्हणाले, “व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या ५२ वर्षांपासून ‘आयएमडीआर’ करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याचा हा गौरव आहे. ‘पीएमए’सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर हा सन्मान मिळणे म्हणजे उद्योगसंबंधित शिक्षण, नवोपक्रमाधिष्ठित अध्यापन, संशोधनाभिमुख दृष्टीकोन आणि मूल्याधिष्ठित नेतृत्व विकासाच्या माध्यमातून भविष्यासाठी सक्षम व्यवस्थापक घडविण्याच्या ‘आयएमडीआर’च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती आहे. या गौरवामुळे भारतातील अग्रगण्य स्वायत्त व्यवस्थापन संस्थांमध्ये ‘आयएमडीआर’चे स्थान अधिक भक्कम झाले आहे.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now