पुणे: लिंगायत समाजातील उद्योजकांची संघटना असलेल्या विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन, इंडियाच्या वतीने दहा समाजबांधवांना ‘बसव उद्योजक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या संघटनेचे अध्यक्ष अनिल मंद्रुपकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अक्कलकोट येथील लायन्स इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी संघटनेचे महासचिव गणेश बिराजदार, सचिव अमित पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित अटलसेवा पुरस्कार व फ्रान्स येथील थीम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून ‘डॉक्टरेट’ पदवी मिळाल्याबद्दल अनिल मंद्रुपकर यांचा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. विश्वेश्वर बँकेचे उपाध्यक्ष राज मिरजे, आनंद बेल्हाड, ऋषिकेश शेरीकर, गणेश माळी, सीए हनुमंतराव चौधरी, प्रियांका गुळवे, राहुल जिगजिन्नी, समीर साखरे विजय लिंगायत यांना ‘बसव उद्योजक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच अक्कलकोट येथील समर्थ हरवळकर आणि कळंब येथील अंजली साखरे या दोन अभियंत्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्षे होते.
विकसित भारत मिशनअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून विश्वेश्वर एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन युवकांमध्ये उद्यमशीलता रुजावी, तसेच त्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाठी कार्यरत असल्याचे अनिल मंद्रुपकर यांनी नमूद केले. सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून राजशेखर कापसे यांनी तरुणांनी उद्योगांकडे वळावे, असे आवाहन केले. नरेंद्र सोलापूर यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत उमरदंड यांनी आभार मानले.





