Raghav Chadha: आम आदमी पार्टीला जबरदस्त धक्का! राघव चढ्ढांचा राजीनामा; दोन तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये जाण्याची घोषणा
आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले की, आम आदमी पार्टी भ्रष्ट लोकांच्या हातात आहे. त्यामुळे, मी ‘आप’ सोडून पुन्हा जनतेकडे परतत आहे. आज आम्ही भाजपमध्ये विलीन होत आहोत. राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदार भाजपमध्ये सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल भाजपमध्ये सामील होणार आहेत. हे तिघेही राज्यसभेचे खासदार आहेत. हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि विक्रम साहनी हे देखील भाजपमध्ये सामील होणार आहेत. अलीकडेच, राघव चड्ढा यांच्या जागी अशोक मित्तल यांची राज्यसभेत ‘आप’चे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राघव चड्ढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या दृढनिश्चयामुळे, आम्ही आता त्यांना खंबीरपणे पाठिंबा देऊ. आम्ही इथे आमचे करिअर घडवण्यासाठी नाही, तर आमचे करिअर मागे सोडण्यासाठी आलो आहोत. मी पक्षाच्या कामांपासून दूर झालो कारण माझ्याकडे दोन पर्याय होते… एकतर राजकारण सोडावे किंवा माझा स्वतःचा मार्ग तयार करावा. ज्या आम आदमी पक्षाला मी माझ्या रक्ताने आणि घामाने, माझ्या तारुण्याची १५ वर्षे समर्पित करून वाढवले, तो पक्ष आता पूर्णपणे आपला उद्देश गमावून बसला आहे.
आज सामान्य लोक आम आदमी पक्षापासून दूर जात आहेत. मी आम आदमी पक्ष सोडत असल्याची घोषणा करत आहे. मी या पक्षाचा संस्थापक सदस्य होतो. कदाचित माझ्यापेक्षा या पक्षाला अधिक चांगले कोणीही ओळखत नसेल. आता आम आदमी पक्ष तो जुना पक्ष राहिलेला नाही. मी एक वर्ष पक्षाच्या कामांपासून दूर राहिलो कारण मी त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांच्या बाजूने नव्हतो. मी त्यांच्या मैत्रीस पात्र नव्हतो कारण मी त्यांच्या गैरकृत्यांच्या बाजूने नव्हतो, असं राघव चड्ढा म्हणाले आहेत.
संदीप पाठक म्हणाले, “राज्यसभेत आम आदमी पक्षाचे एकूण १० खासदार आहेत, त्यापैकी दोन-तृतीयांश आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्या सह्या राज्यसभा अध्यक्षांकडे सादर केल्या आहेत. माझ्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी १० वर्षे या पक्षाशी संबंधित होतो. आज मी आम आदमी पक्षापासून फारकत घेत आहे.”
ते म्हणाले, “मी ज्यांचा मुलगा आहे, तोच मी आहे आणि शिक्षणानंतर मी आयआयटीमध्ये प्राध्यापक झालो. काहीतरी चांगले करणे हेच माझे एकमेव ध्येय होते. मला प्रामाणिकपणे देशाची सेवा करायची होती, म्हणून मी आम आदमी पार्टीची निवड केली. मी नेहमी पक्षाला प्रथम स्थान देतो. देशासाठी काम करणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. आम आदमी पार्टीमध्ये माझ्यासोबत काम केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. माझा मार्ग आजच्या मार्गापेक्षा वेगळा होता. मी देशभरातील स्वयंसेवकांचे आभार मानतो.”
‘आप’ला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश, व्यवसायाने CA, बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे राघव चड्डा कोण?
Who is Raghav Chadha: ना कुठल्या निवडणुका, ना कुठल्या राजकीय नेत्यांच्या सभा तरीही राजधानी दिल्लीत मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या खासदार राघव चढ्ढांसह आम आदमी पार्टीच्या 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केलाय. आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरुन हटवलं होतं. त्यानंतर, आता पत्रकार परिषद घेत आज राघव चढ्ढा (Raghav chhadha join bjp) यांनी आम आदमी पार्टीपासून (AAP) दूर जात जनतेकडे जात आहे, असं म्हटलं. राघव चढ्ढा यांच्यासह आपचे राज्यसभेचे 7 खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आपचे राज्यसभेत एकूण 10 खासदार होते. विशेष म्हणजे आक्रमक नेते राघव चड्डा यांना राज्यसभा उपनेते पदावरुन हटवल्यानंतर आपने अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही धुरा सोपवली होती. मात्र, राघव चढ्ढांसह आता ते देखील भाजपात गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात राघव चड्डा यांची राजकीय कारकीर्द…
Who is Raghav Chadha: कोण आहेत राघव चड्डा?
राघव चड्डा यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे रंजक आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) असलेले राघव यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून (LSE) उच्च शिक्षण घेतले आहे. 2011 मध्ये त्यांनी ‘आयसीएआय’मधून सीएची पदवी मिळवली. 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरमध्ये राघव चड्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. लंडनमध्ये शिक्षणादरम्यान झालेली त्यांची मैत्री पुढे प्रेमात बदलली. या हाय-प्रोफाईल लग्नामुळे राघव चड्ढा राष्ट्रीय स्तरावर घराघरात पोहोचले. परिणीती अनेकदा संसदेच्या गॅलरीत बसून राघव यांचे भाषण ऐकताना दिसते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
Who is Raghav Chadha: पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड
2015 मध्ये अवघ्या 26 व्या वर्षी त्यांची ‘आप’चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. 2020 मध्ये राजेंद्र नगर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मिळालेल्या ऐतिहासिक विजयात प्रभारी म्हणून राघव चड्डा यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून एप्रिल 2022 मध्ये त्यांची पंजाबमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.
Raghav Chadha: राघव चड्डा यांना उपनेते पदावरून हटवले
दरम्यान, दरम्यान, आम आदमी पार्टी (आप) ने गुरुवारी खासदार राघव चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती पक्षाने राज्यसभा सचिवालयाला दिली असून, पत्रात चड्डा यांना सभागृहात पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. राघव चड्डा हे 2022 पासून पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 2028 मध्ये संपणार आहे. या निर्णयामागील कारण पक्षाने स्पष्ट केलेले नाही. मात्र, चड्डा काही काळापासून पक्षापासून दूर असल्याची चर्चा होती आणि त्यांनी ‘आप’बाबत सार्वजनिक भूमिका मांडलेली नव्हती.
Raghav Chadha Post: उपनेते पद गेल्यानंतरची ‘ती’ सूचक पोस्ट
पक्षाने उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांनी ‘X’ वर 2 मिनिटे 45 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अलीकडच्या काळात संसदेत सर्वसामान्यांच्या हितासाठी उठवलेल्या आवाजाची झलक दाखवली आहे. मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा, मोबाइल रिचार्जमधील 28 दिवसांचा ‘स्कॅम’,इन्कमिंग कॉल चार्जेस आणि डेटा एक्स्पायरी समस्या, पेपर लीक प्रकरण आणि हवाई प्रदूषणाचा प्रश्न, आरोग्य विम्यावरील GST आणि विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, पॅटर्निटी लीव (पितृत्व रजा) आणि बँकांमधील मिनिमम बॅलन्स दंड, अशा प्रमुख मुद्द्यांचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी ‘इव्हिल आय’ (Evil Eye) इमोजीचा वापर केला आहे.
Ashok Mittal: पक्षाची भूमिका आणि नवे नेतृत्व
नवे उपनेते अशोक कुमार मित्तल यांनी हा बदल म्हणजे एक ‘सामान्य प्रक्रिया’ असल्याचे म्हटले आहे. राघव चड्डा हे अनुभवी नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर खासदार संजय सिंह यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले आहे.





