भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; सासू पार्वती म्हणाल्या, तो तिकडे जाऊन…

By: Editor_Pratik

On: Tuesday, April 14, 2026 6:10 AM

Google News
Follow Us

नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधातील गुन्ह्यांची मालिका दिवसेंदिवस गंभीर होत असून, चौथ्या गुन्ह्याप्रकरणी त्याला आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर असून, पोलिसांकडून त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात खरातची सासू पार्वती शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, “गेल्या महिनाभरापासून मी येथे आहे, मात्र चौकशीबाबत मला काहीच माहिती नाही. माझी मुलगी कल्पना कुठे आहे, हेही माहीत नाही. तिच्याशी संपर्क झालेला नाही,” असे सांगितले. अशोक खरातच्या कृत्यांबाबत विचारले असता, “तो ऑफिसमध्ये जाऊन काय करायचा, याची मला आणि कल्पनालाही काहीच कल्पना नव्हती,” असा दावा त्यांनी केला. तसेच “तो दोषी आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण आता त्याला कोण सोडवणार,” असेही त्या म्हणाल्या.

पत्नी कल्पना खरात अद्याप फरार

या प्रकरणातील महत्त्वाची आरोपी असलेली अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही अद्याप फरार आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती नाशिकमधील घरातून पसार झाली. गेल्या १५ दिवसांपासून तपास यंत्रणेला तिचा माग काढण्यात यश आलेले नाही.

पोलिसांनी तिच्या माहेरी तसेच नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली असून, मैत्रिणी आणि घरातील सध्याच्या व माजी नोकरांचीही विचारपूस करण्यात आली आहे. मात्र अद्याप ठोस धागेदोरे मिळाले नसून, तिचा शोध सुरूच आहे.

समता पतसंस्थेतील खात्यांचा तपास वेगात

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारांचाही तपास वेगाने सुरू आहे. शिर्डी पोलिसांनी ५६ खातेदारांच्या सुमारे १०० खात्यांची चौकशी हाती घेतली आहे. या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांच्या नावांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

मात्र, संबंधित खाती आपली नसल्याचा दावा प्रतिभा चाकणकर यांनी पोलिसांकडे केला आहे. त्यांनी सांगितले की, खात्यांसाठी वापरलेली कागदपत्रे खरी असली तरी ती कल्पना खरातला इतर कारणांसाठी दिली होती. त्या कागदपत्रांचा गैरवापर करून खाती उघडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणी सकाळी सुरू झालेली चौकशी तब्बल आठ तास चालली. माध्यमांमधील बातम्या पाहिल्यानंतर पोलिसांच्या नोटीसीपूर्वीच त्या स्वतः हजर झाल्याची माहिती समोर आली आहे.

तपास अधिक गतीमान

अशोक खरातविरोधातील विविध गुन्ह्यांमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा होत असून, पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार, बनावट खाती आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now