भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी फोर्स मोटर्सने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 2025-26 चे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने वर्षभरात मजबूत कामगिरी करत आतापर्यंतची सर्वोत्तम वार्षिक आर्थिक कामगिरी नोंदवली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, देशांतर्गत बाजारपेठेत घाऊक विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली आहे. व्हॅन विभागातील आपले वर्चस्व कायम राखत कंपनीच्या ट्रॅव्हलर प्लॅटफॉर्मने 70 टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सा टिकवून ठेवला आहे. ग्रामीण आणि अर्ध-शहरी बाजारपेठांमध्ये विस्तारामुळे विक्रीत 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
संपूर्ण वर्षभरात प्रत्येक तिमाहीत सातत्यपूर्ण कामगिरी, सुधारित ऑपरेटिंग लेव्हरेज आणि सर्व उत्पादन विभागांमधील व्यापक वाढ यामुळे कंपनीने विक्रमी आर्थिक कामगिरी केली. या कामगिरीत लक्ष्यित उत्पादन मिश्रण, कार्यात्मक शिस्त आणि खर्चाचे प्रभावी नियोजन यांचा मोठा वाटा आहे.
कंपनीने आपल्या मुख्य व्हॅन व्यवसायात मजबूत पकड राखत प्रीमियम पॅसेंजर मोबिलिटी क्षेत्रात उपस्थिती वाढवली आहे, तसेच नव्या आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही विस्तार केला आहे. यासोबतच, फोर्स मोटर्सने आपली शून्य-कर्ज स्थिती कायम ठेवत आर्थिक शिस्तीचे उदाहरण दाखवले आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी सांगितले की, “आम्ही नेहमीच नवीन बाजारपेठ निर्माण करण्यात आघाडीवर राहिलो आहोत. अर्बेनिया, ट्रॅव्हलर आणि ट्रॅक्स यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे आमची बाजारपेठेतली उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे. संस्थात्मक आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यामुळे आमची तांत्रिक क्षमता अधिक सक्षम झाली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आर्थिक वर्ष 2025-26 हे आमच्यासाठी अभूतपूर्व ठरले आहे. सातत्यपूर्ण अंमलबजावणी, सुधारित ऑपरेटिंग लेव्हरेज आणि संतुलित उत्पादन मिश्रणामुळे आम्ही ही कामगिरी साध्य केली. पुढील काळातही आम्ही नाविन्य, तंत्रज्ञान आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोन यांवर भर देत व्यवसायाची शिस्तबद्ध वाढ कायम ठेवू.”
फोर्स मोटर्सची ही कामगिरी कंपनीच्या मजबूत धोरणात्मक दिशेचे आणि भविष्यातील वाढीच्या क्षमतेचे स्पष्ट संकेत देणारी ठरली आहे.




