पुणे : राज्यात पुढील पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ नंतर घराबाहेर पडणे टाळावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भातील अकोला जिल्ह्यात तापमान आज ४३ अंशांवर पोहोचले असून पुढील दोन दिवसांत ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्येही तापमान ४२ अंशांवर असून तेही ४५ अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवसांनंतर विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात येणार आहे.
दरम्यान, तळकोकणात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, गेल्या आठवडाभरापासून नागरिक उष्णतेने हैराण झाले होते. तापमान ३६ ते ३८ अंशांच्या दरम्यान राहिल्याने उकाडा वाढला होता. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास आंबा आणि काजू पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मालेगाव येथे अवकाळी पावसानंतर काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा उष्णतेचा तडाखा वाढला असून तापमान ४१.०४ अंशांवर पोहोचले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील रस्ते व बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचे अधिक प्रमाणात सेवन करावे आणि उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातही तापमान चाळीशी पार गेले असून तीव्र उष्णतेमुळे केळीच्या बागांवर परिणाम होत आहे. अर्धापूर, मुदखेड आणि नांदेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड होते; मात्र वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याची पातळी खालावल्याने बागा करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचले असून वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. रस्ते ओस पडले असून नव्याने लागवड केलेल्या फळबागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने उष्माघात प्रतिबंधक कक्ष सुरू केले आहेत.
वाढत्या तापमानाचा शेती कामांवरही परिणाम झाला आहे. शेतकरी दुपारच्या वेळेत कामांना विश्रांती देत असून सकाळच्या सत्रातच सिंचन, निंदन आदी कामे केली जात आहेत. उन्हाळी व भाजीपाला पिकांसाठी सकाळीच सिंचन करण्यावर भर दिला जात आहे.
एकूणच, राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





