मुंबई : Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत चर्चांना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशोक खरात यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असताना त्याच्यासोबतचे चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा वादग्रस्त व्यक्तींसोबत संबंध असल्याचा आभास निर्माण होणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत प्रकरणावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा अधिक तीव्र झाली असून, लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य राजीनाम्याला प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्ही स्तरांवर महत्त्व प्राप्त झाले आहे. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रतिमा नियंत्रणाचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनीही पत्रकार परिषद घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, चाकणकर यांनी यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
एकूणच, अशोक खरात प्रकरणाचा परिणाम आता थेट सत्ताकारणावर दिसून येत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




