Rupali Chakankar : भोंदूबाबाच्या नादी लागल्याने दोन्ही पदं गमावली; रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार
मुंबई : शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे (Ashok Kharat) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही चाकणकरांना राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे आरोप होत असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती समोर आली. परंतु, चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीकडून शुक्रवारी सकाळीच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी सूचना रुपाली चाकणकरांना करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार रुपाली चाकणकर यांनी आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. भोंदूबाबामुळे रुपाली चाकणकरांवर दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यायची वेळ आल्याची चर्चा आहे.
शेकडो महिलांच्या लैंगिक छळाचा आरोप असलेल्या अशोक खरातचे रोज नवनवीन कांड समोर येत आहेत. गुंगीचं औषध प्यायला लावून, त्यांना संमोहित करून खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याचे दोन व्हिडीओही समोर आले आहे. अशोक खरातचे असे 100 हून जास्त व्हिडीओ, दोन लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये चाकणकर या अशोक खरातला थेट विठ्ठलाची उपमा देताना दिसत आहेत. सोबतच चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटोही व्हायरल झाले.
रुपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या संचालिका आहेत. गेल्या वर्षी एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणी रुपाली चाकणकरांनी त्या महिलेला मदत करण्याऐवजी अशोक खरातला मदत केल्याचं समोर आलं. त्यामुळे अशोक खरातवर चाकणकरांचा राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू झाली. रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानतंर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. त्यानतंर चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या दोन्ही भेटीनंतर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.




