पित्याच्या खुनाचा सूड; मुलाकडून तलवारीने थरारक हल्ला, आरोपी ठार

By: Editor_Pratik

On: Wednesday, March 18, 2026 6:18 PM

Google News
Follow Us

पित्याच्या खुनाचा सूड; मुलाकडून तलवारीने थरारक हल्ला, आरोपी ठार

गोंदिया : पित्याच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी तरुणाने थेट तलवारीचा आधार घेत मारेकऱ्याचाच खून केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा-हेटी येथे सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (वय २५) असे असून, आरोपी सुनील आसाराम कांबळे (वय २७) याने त्याच्यावर तलवारीने वार करत निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, देवेंद्र ताराम याच्यावरच सुनीलच्या वडिलांच्या खुनाचा आरोप होता आणि तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून गावात आला होता.

याचाच बदला घेण्यासाठी सुनील संधीच्या शोधात होता. सोमवारी रात्री त्याने देवेंद्रवर अचानक हल्ला करत गळा, मान, हात, पाय आणि पोटावर सलग वार केले. या भीषण हल्ल्यात देवेंद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर सुनील कांबळे थेट गावातील पोलिस पाटील परिमल ठाकूर यांच्या घरी गेला. हातात रक्ताने माखलेली तलवार घेऊन त्याने, “माझ्या वडिलांचा जसा खून केला, तसाच मी भुरुला मारले,” अशी कबुली दिल्याने सर्वजण हादरले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले असता देवेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. शरीरावर खोल जखमा असून कोणतीही हालचाल नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या हत्येत आरोपीचा मोठा भाऊ हंसराज कांबळे याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, प्रत्यक्षदर्शींनी तो घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या थरारक घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now