मिल्कशेक मर्डर! बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली पोलीस मुलगी; जन्मदात्या बापाला संपवलं, हादरवणारा प्लान उघड

By: Editor_Pratik

On: Sunday, March 29, 2026 12:25 PM

Google News
Follow Us

एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमाच्या कथेला शोभेल अशी भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील एका पोलिस महिलेने स्वतःच्या पोलिस असणाऱ्या वडिलांना मिल्कशेकमध्ये विष देऊन संपवले. या घटनेचा कुणालाही थांगपत्ता लागला नाही. पण 3 वर्षांनंतर या महिलेचे प्रियकरासोबत बिनसले आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी जयंत बल्लावार (45) हे 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांची मुलगी आर्या जी सध्या पोलिस कर्मचारी आहे, तिने त्यांना मिल्कशेक करून दिले. वडिलांनी ते मिल्कशेक घेतले आणि कामावर गेले. त्यानंतर ते चंद्रपूरच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीत पोहोचले, तेव्हा त्यांना चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तेव्हा या घटनेत कोणतेही गुन्हेगारी कृत्य दिसून आले नाही.

त्यामुळे जयंत बल्लावार यांच्या आकस्मिक मृत्यूची फाईल बंद करण्यात आली. पण 3 वर्षांनंर अचानक पोलिसांनी जयंत बल्लावार यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची स्वतःची मुलगी व इतर 3 जणांना अटक केली. त्यानंतर झालेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. बल्लावार यांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर एक पूर्वनियोजित खून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला.

त्याचे झाले असे की, आर्या बल्लावार हिचे आशिष शेडमाके नामक तरुणाशी 2022 पासून प्रेमसंबंध होते. आर्याचे वडील जयंत बल्लावार यांचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे ते आर्या व आशिषच्या प्रेमात अडथळा ठरत होते. त्यामुळे आर्याने स्वतःच्या वडिलांना ठार मारण्याचा कट रचला. तिने आपला दूरचा भाऊ चैतन्य गेडाम (22) याला बोलावून घेतले. त्याला 5 हजार रुपये दिले आणि विष आणण्यास सांगितले. या प्रकरणातील चौथा व्यक्ती अद्याप समोर आला नाही. हा व्यक्ती हे विष विकणारा विक्रेता आहे.

त्यानंतर 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी आर्याने आपल्या पोलिस अधिकारी असलेल्या वडिलांसाठी मिल्कशेक बनवले. त्यात हे विष टाकले. हे मिल्कशेक पिऊन जयंत बल्लावार आपल्या कर्तव्यावर निघून गेले. त्यांची ड्युटी जिल्हा कोर्टात होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळले आणि त्यांचा तत्काळ मृ्त्यू झाला. बल्लावर हे सर्वांपुढे चक्कर येऊन पडल्यामुळे ते चालता-बोलता गेले असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे कुणीही त्यांच्या शवविच्छेदनाची मागणी केली नाही.

जयंत बल्लावार यांच्या निधनानंतर आर्याची अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी पोलिस म्हणून निवड झाली. त्यानंतर तिने आशिषशी लग्न केले. मधल्या काळात आशिषही पोलिसांत भरती झाला. पण बेशिस्त व घाणेरड्या वर्तणुकीमुळे त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करम्यात आली.

या काळात आर्याचे आशिष सोबत वाद वाढले. त्यांच्यात नेहमी भांडणे होऊ लागली. त्यानंतर गत आठवड्यात आशिष संतापाच्या भरात पोलिस ठाण्यात गेला आणि तिथे त्याने आपल्या बायकोने अर्थात आर्याने स्वतःच्याच वडिलांना विष देऊन ठार मारल्याचे सांगितले. हे ऐकूण पोलिसांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ आशिषसह आर्या, तिचा भाऊ चैतन्य गेडाम व इतर एकाला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पण या हत्याकांडामुळे अवघे पोलिस दल चक्रावून गेले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now