बापरे ! सिनेमा फिका पडेल अशी थरारक हत्या; पोलिस हवालदारच निघाला मास्टरमाईंड, मृतदेहासह १९१ किमी प्रवास

By: Editor_Pratik

On: Thursday, February 12, 2026 5:27 PM

Google News
Follow Us

सातारा : सिनेमा फिका पडेल अशी थरारक हत्या; पोलिस हवालदारच निघाला मास्टरमाईंड, मृतदेहासह १९१ किमी प्रवास

सातारा/नवी मुंबई : मैत्रीतून निर्माण झालेला संशय आणि त्यातून घडलेली अमानुष हत्या… सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावात शेतविहिरीत सापडलेल्या जळालेल्या मृतदेहामागील धक्कादायक कहाणी समोर आली असून या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार नवी मुंबई पोलिस दलातील कार्यरत हवालदार असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

६ फेब्रुवारी रोजी लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखेड गावातील एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. यानंतर अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल करत लोणंद पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या तीन दिवसांत या भीषण कटाचा उलगडा करण्यात यश मिळवले.

पोलिस हवालदारच निघाला सूत्रधार

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पुण्यातील एका संशयित कारपर्यंत पोहोचले. त्यातून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला. नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार बंडू भिसे याने साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचे समोर आले.

मैत्रीतून संशय, संशयातून कट

हवालदार बंडू भिसे आणि सोमनाथ बोबडे यांच्यात मैत्री होती. मात्र, सोमनाथचे आपल्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय बंडूच्या मनात निर्माण झाला होता. हा संशय वाढत जाऊन सूडाच्या भावनेत परिवर्तित झाला. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी बंडूने पुण्यातून विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे यांना बोलावून घेत हत्येचा कट रचला.

कारमध्ये गळा आवळून खून

५ फेब्रुवारीला कळंबोली येथे आरोपींनी सोमनाथ बोबडे याला जबरदस्तीने होंडा सिटी कारमध्ये बसवले. त्याचे हातपाय बांधून गाडीतच गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह कारमध्येच ठेवून आरोपी साताऱ्याकडे रवाना झाले. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह पुढील सीटवर बसवून आरोपींनी तब्बल १९१ किलोमीटरचा प्रवास केला.

विहिरीजवळ मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

सुखेड गावात पोहोचल्यानंतर विहिरीच्या काठावर मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला आणि नंतर विहिरीत ढकलण्यात आला. त्यानंतर आरोपी मुंबईकडे परतले. मुख्य आरोपी स्वतः पोलीस दलात कार्यरत असल्याने कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

अटकेनंतर सुरुवातीला बंडू भिसे याने गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र, लोणंद पोलिसांनी त्याच्या साथीदारांना विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड झाला. या प्रकरणामुळे पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026